महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे | दि. ७ | राजकारणात बोललेले शब्द कधी कधी क्षणात टाळ्यांचा कडकडाट मिळवतात, पण त्याच शब्दांचे पडसाद पिढ्यान्पिढ्या घुमत राहतात, याची आठवण रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा झाली. “लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील” असे विधान करताच केवळ राजकीय वातावरण तापले नाही, तर मराठवाड्याच्या मनालाही ठेच लागली. विलासराव देशमुख हे केवळ काँग्रेसचे नेते नव्हते, तर दुष्काळ, संघर्ष आणि स्वाभिमान यांचा चेहरा होते. त्यामुळे त्यांच्या आठवणी पुसण्याची भाषा ही केवळ एका कुटुंबावर नव्हे, तर संपूर्ण लातूरवर केलेला आघात ठरली. टीकेचा भडिमार, आंदोलनं, पुतळादहन—हे सगळं त्या एका वाक्याचं राजकीय व्याज होतं, जे चव्हाण यांना लगेचच चुकवावं लागलं.
या सगळ्या गदारोळात अभिनेता रितेश देशमुख यांनी कोणतीही आक्रमकता न दाखवता चार वाक्यांत जे सांगितलं, तेच सर्वाधिक बोचणारं ठरलं. “लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही”—ही केवळ ओळ नव्हे, तर विलासराव देशमुख यांच्या राजकीय आणि सामाजिक वारशाचं सार होतं. सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडीओमध्ये रितेश यांनी आवाज न चढवता, बोट न रोखता, पण थेट मनावर बोट ठेवलं. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरली जातात, असं सांगताना त्यांनी राजकारणातल्या उथळ वक्तव्यांची मर्यादा दाखवून दिली. कधी कधी आरडाओरड न करता सांगितलेली गोष्ट जास्त खोलवर जाते, याचं हे जिवंत उदाहरण ठरलं.
काँग्रेसकडूनही या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त झाला. “ही भाजपची वैचारिक दिवाळखोरी आहे,” अशी टीका सतेज पाटील यांनी केली, तर लातूरकरांच्या स्वाभिमानाचा दाखला देत हर्षवर्धन सपकाळ यांनी चव्हाण यांना सुनावलं. शेवटी वाढता दबाव पाहून रवींद्र चव्हाण यांना माफी मागावी लागली, पण राजकारणात माफी मागणं आणि चूक पुसणं या दोन वेगळ्या गोष्टी असतात. कारण शब्द मागे घेता येतात, पण भावनांवर उमटलेले व्रण राहतच असतात. या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट झाली—सत्तेच्या जोरावर आठवणी पुसता येतात, असा गैरसमज कुणीही करू नये. कारण काही नावं इतिहासात लिहिली जात नाहीत, ती लोकांच्या हृदयात कोरली जातात. आणि अशी कोरलेली अक्षरं पुसण्याची ताकद कुठल्याही राजकीय वक्तव्यात नसते.
