महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १३ सप्टेंबर – नवीदिल्ली -:एकीकडे हिंदुस्थान व चीनमधील तणाव दूर करण्यासाठी दोन्ही देशाचे परराष्ट्रमंत्री पंचसूत्री ठरवत असताना दुसरीकडे चिनी लष्कराने पूर्व लडाखमध्ये पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या स्पंगुर गॅप येथे हिंदुस्थानी जवानांच्या रायफल रेंजमध्ये चीनने हजारो सैनिक, रणगाडे आणि हॉवित्झर्स तोफा तैनात केल्या आहेत. चीनच्या या कुरापतखोरीच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी लष्कराचे जवानही हाय अॅलर्टवर आहेत.
गुरुंग हिल आणि मागर हिलदरम्यान असलेल्या स्पंगूर गॅप येथे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने आपल्या तुकड्या तैनात केल्या आहेत. हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी प्रत्यक्ष ताबा रेषेवरील चुशूलजवळील पँगाँग त्सोच्या दक्षिण किनाऱ्याजवळील उचं शिखरांवर ३० ऑगस्टला ताबा घेतलेला आहे. यानंतर चीनने ही तैनाती केली आहे. चिनी सैनिकांच्या तुकड्या पाहता हिंदुस्थानी लष्करानेही स्पंगूर गॅपमध्ये जवानांना तैनात केले. दोन्ही देशांच्या सैन्य आणि बंदुका या ठिकाणी शूटिंगच्या रेंजमध्ये म्हणजे गोळीबाराच्या टप्प्यात आहेत.
चीनने मिलिशिया पथके तैनात केली- चीनने सीमेवर स्थिती बाजू बळकट करण्यासाठी आणि तिबेटच्या स्थिरतेच्या नावाखाली सैन्यातील मिलिशिया पथके तैनात केली आहेत. महत्त्वाच्या उंच आणि महत्त्वाचाच्या शिखरांवर तैनात असलेल्या हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांना हटवण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे. मिलिशिया पथकात गिर्यारोहक, मुष्ठियोद्धा, स्थानिक फाइट क्लबचे सदस्य असतात व त्यातील बहुतेक स्थानिक असतात. हे मिलिशिया पथक चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीचे राखीव दल आहे. युद्धाच्या काळात ते सैन्यकार्यात पीएलएला मदत करतात आणि स्वतंत्र कारवाईही करतात.
… तर हिंदुस्थानचे लष्करही ठोस उत्तर देईल – चिनी सैनिकांनी कुठलेही चिथावणीखोर पावले उचलली तर ठोस प्रत्युत्तर दिले जाईल, असे हिंदुस्थानी लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले. पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर असलेले पीएलए सैनिक फिंगर – 4 भागातील शिखरांवर कब्जा करत आहेत. त्याचबरोबर हिंदुस्थानी जवानांनीही त्यांची उंची पाहून आपल्या ठिकाणांचा ताबा घेतला आहे.