IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही ट्रॅफिक जाम; ‘सिलिकॉन व्हॅली’चा श्वास कोंडतोय!

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ९ जानेवारी २०२६ | बेंगळुरू | “नोकरी मिळते, पण आयुष्य हरवतं” अशी अवस्था सध्या भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूची झाली आहे. पुण्यातील हिंजवडीसारख्या आयटी हबमधील ट्रॅफिक कोंडीमुळे कंपन्या बाहेर पडत असताना, ज्या शहरांकडे त्या वळत आहेत तिथे परिस्थिती काही वेगळी नाही, याचं जिवंत उदाहरण म्हणजे बेंगळुरू. खड्डेमय रस्ते, कोलमडलेली पायाभूत सुविधा आणि न संपणारी वाहतूक कोंडी यामुळे शहर अक्षरशः ठप्प झालं आहे. या सगळ्याला वैतागलेल्या एका स्थानिक रहिवाशाने सोशल मीडियावर व्यक्त केलेला संताप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

रेडिटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये संबंधित व्यक्तीने बेंगळुरूचं विदारक वास्तव उघड केलं आहे. “मी याच शहरात जन्मलो, वाढलो. एकेकाळी हिरवंगार, निवांत वाटणारे बेंगळुरू आता हळूहळू ढिगाऱ्यात बदलताना पाहतोय,” असं तो लिहितो. शहरातील रस्त्यांची अवस्था ‘दयनीय’ असल्याचं सांगत त्याने सरकारी नियोजनावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. “हे आयटी हब आहे की नरकाचे द्वार?” असा थेट सवाल त्याने उपस्थित केला असून, ही पोस्ट अनेकांच्या मनातील असंतोषाला वाट करून देणारी ठरली आहे.

या पोस्टमधील अनुभव थरकाप उडवणारे आहेत. संबंधित व्यक्तीने दावा केला आहे की, पहाटे ३:३० वाजताही इंदिरानगर ते मान्यता टेक पार्क हे अंतर कापायला तब्बल दोन तास लागले. दिवसा काय अवस्था असेल, याचा अंदाज यावरूनच यावा. एवढंच नव्हे तर शहरात अनेक ठिकाणी इमारतींचे बीम कोसळणे, पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळणे, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. जुने रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याऐवजी सरकार नव्या बोगद्यांच्या घोषणा आणि कर वाढवण्यावर भर देत असल्याचा आरोपही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

ही पोस्ट व्हायरल होताच हजारो नेटकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. “बेंगळुरू हळूहळू मरत आहे,” “भारतीय खेड्यांची अवस्था शहरातील अनेक भागांपेक्षा चांगली आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आयटी हब, स्टार्टअप राजधानी, जागतिक शहर — या बिरुदांआड दडलेली ही वास्तवाची कोंडी आता उघडपणे समोर येत आहे. प्रश्न एकच आहे — बेंगळुरू खरंच स्मार्ट सिटी बनणार आहे, की ट्रॅफिक जाममध्येच स्वतःचा श्वास गमावणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *