चार मते दिल्याशिवाय मतदान अपूर्ण! प्रभाग पद्धतीमुळे मतदारांसमोर नवा नियम; ‘नोटा’ही द्यावीच लागणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ९ जानेवारी २०२६ | राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, यंदा मतदारांसाठी एक महत्त्वाचा आणि अनेकांना गोंधळात टाकणारा नियम लागू झाला आहे. मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये प्रभाग पद्धत लागू करण्यात आली असून, यामुळे मतदारांना चार मते दिल्याशिवाय मतदान पूर्णच होणार नाही. “एक मत, एक बटन” ही सवय असलेल्या मतदारांसाठी ही प्रक्रिया नवी असून, निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

प्रभाग पद्धतीनुसार चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग तयार करण्यात आला आहे. प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडले जाणार असून, ते अ, ब, क आणि ड अशा चार जागांवरून निवडणूक लढवतात. त्यामुळे मतदारांनी ईव्हीएमवर चार वेगवेगळ्या बटनांवर मतदान करणे बंधनकारक आहे. अनेकदा मतदारांना एखादा किंवा दोनच उमेदवार पसंत असतात. अशावेळी मतदार दोन-तीन बटण दाबून मतदान केंद्राबाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, चार मते न दिल्यास ईव्हीएम मतदान प्रक्रिया पूर्ण होऊ देत नाही, हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, एखाद्या जागेसाठी उमेदवार पसंत नसेल, तरीही मतदान टाळता येणार नाही. अशा परिस्थितीत त्या जागेसाठी ‘नोटा’ (None of the Above) या पर्यायाचं बटन दाबणं बंधनकारक आहे. म्हणजेच, मतदाराला चारपैकी एखादाही उमेदवार नको असला, तरी शेवटपर्यंत मतदान करून नोटा दाबल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे “कोणालाच मत द्यायचं नाही” असं म्हणून मतदान अर्धवट सोडता येणार नाही, हा या पद्धतीचा कळीचा मुद्दा आहे.

ही संपूर्ण प्रक्रिया बहुसदस्य निवडणूक पद्धती म्हणून ओळखली जाते. प्रत्येक प्रभागात चार जागा असल्याने प्रत्येक मतदाराला चार मतांचा अधिकार आहे. मतदारांना गोंधळ होऊ नये म्हणून प्रत्येक जागेच्या मतपत्रिकेला वेगवेगळा रंग देण्यात आला आहे.
🔹 जागा ‘अ’ – पांढरा रंग
🔹 जागा ‘ब’ – फिका गुलाबी
🔹 जागा ‘क’ – फिका पिवळा
🔹 जागा ‘ड’ – फिका निळा

या रंगांनुसारच ईव्हीएमवर बटण दाबायचं असून, चारही जागांसाठी मतदान केल्यावरच मतदाराची प्रक्रिया पूर्ण मानली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *