प्रभाग १५ : नावांची गर्दी, घोषणाांचा गजर आणि राजकारणाची रंगीत तालीम

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी – मंगेश खंडाळे| दि. ९ जानेवारी २०२६ |  प्रभाग क्रमांक १५ मध्ये गुरुवारी जे दृश्य पाहायला मिळाले, ते एखाद्या निवडणुकीपेक्षा जत्रेलाच शोभेल असे होते. सकाळच्या उन्हाने वातावरण तापले होतेच; पण पंचतारानगर ते आकुर्डी दरम्यान निघालेल्या भाजपच्या प्रचारयात्रेने राजकीय पारा आणखी वर नेला. पुढे भाजपचे अधिकृत उमेदवार शैलजाताई मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ आणि अमित गावडे—आत्मविश्वासाने चालणारे, हसत-हसत हात हलवणारे आणि “आम्ही तयार आहोत” असा अविर्भाव चेहऱ्यावर बाळगणारे. ही मिरवणूक नव्हती; ही एक जाहीर घोषणा होती की प्रभाग १५ मध्ये राजकारण आता फक्त चर्चेचा विषय राहिलेला नाही, ते रस्त्यावर उतरले आहे.

या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामागे चालणारी माणसं. सलीम भाई शिकलगार, राजु बाबर, नरेंद्र येलकर, सुहास करडे, बंटी काळभोर, सचिन पांढरकर, अण्णा बुट्टे, सागर पांढरकर, रामभाऊ पांढरकर, पांडुरंग मोहिते आणि जयंत काळभोर ही नावे केवळ कार्यकर्त्यांची नव्हती, तर गल्ली-गल्लीत ओळख असलेल्या चेहऱ्यांची होती. त्यांच्यामागे किरण बोरकर, आप्पा आढाव, योगेश खंडागळे, प्रसाद ताडे, मोहन यादव, महेश जानुगडे आणि अमित जायगुडे ठामपणे चालताना दिसत होते. ही गर्दी आकस्मिक नव्हती; ती जुळवून आणलेली, मोजून मांडलेली आणि ताकद दाखवण्यासाठीच उभी केलेली होती.

यादी इथेच संपत नव्हती. विशाल सोनवणे, शशिकांत काशीद, किशोर कदम, अतुल जायगुडे, गिरीश कुलकर्णी, सपकाळ काका, जायगुडे काका, पंकज जाधव, मानस शिंदे, आकाश जाधव आणि अण्णा काशीद यांनी यात्रेला वेग दिला. मनीषा भारंबे, तृप्ती निंबळे, छाया ताकवले, पाटील काकू, निर्मळे काकू आणि आशा मराठे यांची उपस्थिती सांगत होती की ही लढाई केवळ पुरुषांची नाही; महिलांचाही या राजकारणात ठाम सहभाग आहे. या नावांची ही यादी म्हणजे मतपेटीत उतरवायचा हिशेबच जणू—प्रत्येक नाव एक मत, प्रत्येक चेहरा एक शक्यता.

प्रचारादरम्यान विकासकामांच्या घोषणा झाल्या, प्रश्न विचारले गेले, काही ठिकाणी टाळ्या वाजल्या तर काही ठिकाणी कुजबुज ऐकू आली. पण एक गोष्ट स्पष्ट झाली—प्रभाग १५ मध्ये निवडणूक म्हणजे केवळ तारीख नाही, ती एक स्पर्धा आहे. विरोधकांसाठी हा इशारा आहे आणि मतदारांसाठी एक कसोटी. कारण शेवटी प्रश्न एकच आहे: नावांची यादी मोठी असली तरी कामांची यादी किती मोठी आहे? याच उत्तरावर प्रभाग १५ चा निकाल ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *