महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ९ जानेवारी २०२६ | ठाकरे बंधू युतीच्या घोषणेनंतर दिलेल्या संयुक्त मुलाखतीत राज ठाकरे यांनी मुंबईच्या संपत्तीवरून थेट सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं आहे. “आज मुंबई मराठी माणसाच्या हातात नाही,” असं ठामपणे सांगत त्यांनी मुंबईची संपत्ती विशिष्ट वर्गाकडे एकवटली असून ती गुजरातकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप केला. संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर नाव न घेता, पण स्पष्ट इशाऱ्यांतून जोरदार टीका केली.
“मुंबईचा जमिनीचा तुकडा तुमच्याकडे, पण संपत्ती आमच्याकडे?” असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून दिली. त्या काळातही मुंबई गुजरातला द्यावी, अशी मागणी अमराठी धनदांडग्यांकडून होत होती, आणि आज तीच मानसिकता अधिक मोठ्या प्रमाणात परत आली आहे, असं ते म्हणाले. “तेव्हा पाच लोक होते, आज पाचशे आहेत,” असा टोला लगावत, केंद्र आणि राज्य सरकारकडून मुंबईबाबत घेतले जाणारे निर्णय पाहता, आतापर्यंत कधीच न वाटलेला धोका आज जाणवतो, असं गंभीर चित्र त्यांनी रंगवलं.
MMR क्षेत्रात सुरू असलेल्या घडामोडींवर बोट ठेवत राज ठाकरे यांनी वाढवण बंदर आणि विमानतळाच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “मुंबई विमानतळ आहे, नवी मुंबई विमानतळ उभं राहतंय, मग वाढवणमध्ये विमानतळ कशासाठी?” असा थेट सवाल त्यांनी केला. सध्याचं मुंबई विमानतळ अदानींकडे असल्याचं नमूद करत, कार्गो हळूहळू वाढवण आणि नवी मुंबईकडे वळवून, मुंबईचं विमानतळ आणि आसपासचा अमूल्य भूभाग विक्रीस काढण्याचा डाव आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. “ते क्षेत्रफळ एवढं मोठं आहे की त्यात किमान ५० शिवाजी पार्क मैदानं मावतील,” असं उदाहरण देत त्यांनी धक्कादायक गणित मांडलं.
हे सगळं मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच घडलं का? या प्रश्नावर राज ठाकरे थांबले नाहीत. “ते त्यानंतरच तर झालं,” असं ठाम उत्तर देत त्यांनी अदानी–अंबानी तुलना केली. “अंबानी मोदी येण्याआधीपासून मोठे होते, अदानी मात्र मोदी मोठे झाल्यावरच मोठे झाले,” असा थेट आरोप त्यांनी केला. मुंद्रा बंदरापासून ते केंद्रात मोदी आल्यानंतर मिळालेल्या प्रकल्पांपर्यंत संदर्भ देत, एका उद्योगपतीवरच जर इतकी मेहेरबानी होत असेल, तर भाजप गप्प का? असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला. “सगळी बसवलेली माणसं आहेत,” असं म्हणत काही वरिष्ठ नेत्यांची नावं घेत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर जहरी कटाक्ष टाकला — आणि मुंबईच्या मुद्द्यावर राज ठाकरे आक्रमक मोडमध्ये परतल्याचं स्पष्ट केलं.
