Pune Grand Challenge Tour: ‘सायकलवर जागतिक स्वप्नं, रस्त्यावर स्थानिक कोंडी!

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २१ जानेवारी | पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘टूर डी फ्रान्स’च्या धर्तीवर पुणे ग्रँड चॅलेंज टूर होत आहे, ही बातमी ऐकून सायकलप्रेमी आनंदात हवेत उडाले आणि वाहनचालक मात्र आधीच जमिनीवर बसले! आंतरराष्ट्रीय स्पर्धा, विदेशी सायकलपटू, जागतिक महासंघांची नावे—सगळं ऐकायला भारी. पण ही स्पर्धा जेव्हा थेट पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर उतरते, तेव्हा सामान्य माणसाला एकच प्रश्न पडतो—“आपण कुठून जायचं?” शुक्रवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत शहरातील प्रमुख मार्गांवर प्रवेशबंदी, ‘नो पार्किंग झोन’, ९३ ठिकाणी वाहतूक बदल—हे वाचूनच नागरिकांच्या डोक्यात सायरन वाजायला लागतो. पुणेकर रोजच ट्रॅफिकमध्ये अडकतो, पण आज तो आंतरराष्ट्रीय स्तरावर अडकणार, याचंच समाधान मानायचं!

ही स्पर्धा म्हणजे प्रशासनासाठी अभिमानाची बाब आहे, यात शंका नाही. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, आशियाई आणि आंतरराष्ट्रीय महासंघ यांची उपस्थिती म्हणजे पुण्याचं नाव थेट जागतिक नकाशावर. पण या नकाशात नागरिकांचा रोजचा प्रवास कुठे बसतो, हा प्रश्न मात्र कोणी विचारत नाही. बावधन, सांगवी, वाकड, निगडी, पिंपरी, चिखली—या सगळ्या भागांत वाहतूक बदल म्हणजे आधीच गजबजलेल्या रस्त्यांवर अजून एक प्रयोग! पोलिसांची वाहनं आणि स्पर्धेची वाहनं मात्र मोकाट, आणि सामान्य माणूस ‘पर्यायी मार्ग’ शोधत फिरणारा. पुणेकराला पर्यायी मार्गांची सवय आहे, कारण मूळ मार्गावर जाणं हीच आता लक्झरी झाली आहे. सायकलपटू वेगात जाणार, आणि आपण मात्र सिग्नलवर उभं राहून त्यांच्या फोटोवर लाईक मारणार—हा आधुनिक नागरी अनुभव!

वाहतूक पोलिस उपायुक्त म्हणतात, “नागरिकांनी सहकार्य करावे.” पुणेकर सहकार्य करतोच—तो रोज खड्डे, सिग्नल, बॅरिकेड्स यांच्याशी सहकार्य करतो! पण प्रश्न सहकार्याचा नाही, तर नियोजनाचा आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा शहरात येते, हे चांगलं; पण ती येताना शहर थांबतं, हे कितपत योग्य? सायकल ही पर्यावरणपूरक वाहतूक आहे, हे शिकवण्यासाठी जर अर्धं शहर बंद ठेवावं लागत असेल, तर संदेश थोडा विस्कळीत वाटतो. तरीही, ही स्पर्धा यशस्वी झाली तर पुण्याला नवी ओळख मिळेल, हेही तितकंच खरं. शेवटी एकच अपेक्षा—सायकलपटू सुखरूप पोहोचोत, वाहतूक सुरळीत सुटोत आणि पुणेकराला घरी पोहोचायला टूर डी फ्रान्स पूर्ण करावी लागू नये!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *