Mumbai Pune Expressway Traffic Jam : दुसऱ्याही दिवशी ‘जाम’! बोरघाटात ‘ब्रेक’ लागलेली शहाणपणाची गाडी!

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २६ जानेवारी | मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट म्हणजे आजच्या महाराष्ट्राचं जिवंत रूपक आहे. गाड्या रांगतायत, लोक चिडतायत आणि प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे ‘नियोजन सुरू आहे’ या एकाच गिअरमध्ये अडकलेलं! प्रजासत्ताक दिनाचा विकेंड आला आणि देश स्वतंत्र असल्याचा आनंद साजरा करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले. मात्र बोरघाटात पोहोचताच त्यांना कळलं—आपण स्वतंत्र देशात असलो, तरी वाहतुकीच्या बाबतीत अजूनही गुलामच आहोत. तासन्‌तास एकाच जागी उभ्या असलेल्या गाड्यांतून लोकांनी पेट्रोल जाळलं, संयम जाळला आणि शेवटी प्रशासनालाच शिव्या घालून मन शांत केलं. इथे हॉर्न वाजतात, ब्रेक तापतात आणि शहाणपण मात्र पूर्णपणे निकामी झालेलं असतं.

या कोंडीला कारणं शोधायची झाली, तर यादी इतकी मोठी आहे की ती स्वतंत्र ‘पंचवार्षिक योजना’ ठरू शकेल. अवजड वाहनं मधल्या लेनमध्ये ठाण मांडून बसलेली, हलकी वाहनं वाट शोधत कासवगतीने सरकणारी, नवखे चालक नियमांना ‘सूचना’ समजणारे आणि अनुभवी चालक नियमांना ‘विनोद’ मानणारे! एखादं वाहन जरा जरी खोकलं, तरी मागे दहा किलोमीटरची रांग लागते. ब्रेक फेल, क्लच प्लेट संपली, इंजिन तापलं—या सगळ्या गोष्टी घाटात इतक्या नियमित घडतात की त्या आता अपघात राहिलेल्या नाहीत, तर परंपरा बनल्या आहेत. वर कडी म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा बस्तान मांडणारे व्यावसायिक—जणू घाट नाही, तर आठवडी बाजार!

प्रशासन मात्र दरवेळी ‘मिसिंग लिंक’चा हार घालून मिरवतं. “मे अखेरीस काम पूर्ण होईल” हे वाक्य इतकं जुनं झालंय की तेही आता वाहतुकीत अडकलं असावं. कागदावर उपायांची रेलचेल आहे—कारवाई करा, दंड वाढवा, मनुष्यबळ वाढवा. प्रत्यक्षात मात्र पोलिस अपुरे, कर्मचारी थकलेले आणि वाहनचालक मोकाट! शनिवार-रविवारी एक लाखांहून अधिक गाड्या मार्गावर येतात, हे सगळ्यांना माहिती आहे; तरीही नियोजन शून्यच. बोरघाट आज प्रश्न विचारतोय—रस्ता लहान आहे म्हणून कोंडी होते की आपली व्यवस्थाच इतकी अरुंद आहे? गाड्या पुढे सरकतील कधीतरी; पण शहाणपण, शिस्त आणि जबाबदारीची गाडी मात्र अजूनही ‘ब्रेकडाऊन’मध्येच आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *