कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर ; शरद पवार यांनी केंद्राला दिला ‘हा’ सल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ सप्टेंबर – मुंबई – केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आता सक्रिय झाले आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. यासाठी ते थोड्याचवेळात केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे आणि डॉ. भारती पवार असतील, अशी माहिती मिळत आहे. या भेटीनंतर केंद्र सरकार कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काही उपाययोजना करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर निर्यातीसाठी पाठवलेला कांदा मुंबई बंदर आणि बांग्लादेशच्या सीमेवर अडकून पडला आहे. त्यामुळे आता बाजारपेठेतील कांद्याचे भाव खाली पडण्यास सुरुवात झाली आहे. कांद्याचे भाव २६०० ते २७०० रुपयांपर्यंत खाली कोसळलेत. तर मुंबई बंदरातून निर्यातीसाठी निघालेला ४०० कंटेनर कांदा सडण्याची भीती व्यक्त होत आहे. नाशकात कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

महाराष्ट्रातूनही या निर्णयाला मोठ्याप्रमाणात विरोध होण्याची शक्यता आहे. कांदा निर्यातबंदी हा शेतकऱ्यांशी केलेला विश्वासघात असल्याची प्रतिक्रिया किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता राज्यातील शेतकरी संघटना आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. मात्र, त्यापूर्वी शरद पवार यावर काही तोडगा काढण्यात यशस्वी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *