![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २७ जानेवारी | दिल्लीच्या उत्तर ब्लॉकमध्ये अर्थसंकल्प तयार होत असतो, पण देशात तो जणू स्वर्गातून अवतरतो! प्रत्यक्षात मात्र या बजेटच्या गाभ्यात बसलेले असतात सात अधिकारी—निर्मला सीतारमण यांचे ‘सप्तर्षी’. नाव जरी पौराणिक वाटत असलं, तरी यांचं काम अत्यंत ऐहिक आहे—कर कुणावर, खर्च कुठे, कपात कशात आणि घोषणा किती शब्दांची! अनुराधा ठाकूर या या समूहाच्या धुरीण. आर्थिक व्यवहार सचिव म्हणून त्या बजेटचा आराखडा आखतात. पैसा कुठून आणायचा, कुठे द्यायचा आणि कुठे ‘नंतर पाहू’ म्हणायचं—हे ठरवताना त्यांच्या टेबलावर आकड्यांचा ढीग असतो, पण देशाचा श्वासही त्यात अडकलेला असतो. पहिल्या महिला म्हणून हा विभाग सांभाळताना त्यांनी इतिहास रचला, पण बजेटच्या दिवशी जनता फक्त एवढंच पाहते—खिशात काय पडलं?
या ‘सप्तर्षी’ंचा दुसरा तारा म्हणजे अरविंद श्रीवास्तव. महसूल सचिव म्हणून ते करांचा धर्मगुरू! आयकर, जीएसटी, सीमाशुल्क—या तीन मंत्रांनी सरकारचं तिजोरी भरायची जबाबदारी त्यांची. अत्रेंच्या भाषेत सांगायचं तर, “कर लावताना हात हलका आणि वसूल करताना मन कणखर!” पहिलंच बजेट असल्याने त्यांच्याकडून मध्यमवर्गाचं विशेष लक्ष आहे. त्याचवेळी खर्च सचिव वुअलनाम वुअलनाम सरकारला आवर घालतात—“इतकंच खर्च करा, नाहीतर तूट वाढेल!” एकीकडे योजना, सबसिडी, घोषणांचा मारा आणि दुसरीकडे तिजोरीची शिस्त—या दोहोंमध्ये त्यांची कसरत म्हणजे आर्थिक योगासनच! तर एम. नागराजू बँका, विमा आणि पेन्शनचा संसार सांभाळतात. डिजिटल इंडिया गुळगुळीत चालवताना सामान्य माणसाचं खातं मात्र अजूनही ‘बॅलन्स पाहून’ थांबतं—हा विरोधाभास त्यांच्याही नजरेतून सुटलेला नाही.
उरलेले दोन तारे—अरुणिष चावला आणि के. मोसेस चालई—सरकारी मालमत्तेचे सौदागर. एक विनिवेश करून पैसा आणतो, दुसरा सरकारी कंपन्यांचा खर्च तपासतो. “सरकार व्यापारी नाही,” असं म्हणतानाच सरकारला माल विकून पैसे कमवावे लागतात— ! आणि या सगळ्यांच्या माथ्यावर बसलेले मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन—बजेटचे तत्वज्ञ. ७.४ टक्के विकासदराचं स्वप्न, जागतिक मंदीची भीती, महागाईची चिमूट—या सगळ्यांचं गणित ते मांडतात. प्रश्न एवढाच आहे—हे ‘सप्तर्षी’ मिळून असा अर्थसंकल्प देतील का, जो कागदावर सुंदर आणि घरात उपयोगी ठरेल? कारण देशाला आता घोषणा नकोत, तर दिलासा हवा… आणि तो मिळाला, तरच हा सप्तर्षी खऱ्या अर्थाने उजळून निघेल!
