![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ३० जानेवारी २०२६ | कधीकाळी ‘जागतिकीकरण’ म्हणजे जादूचा शब्द होता. सीमारेषा विरघळल्या, बाजार खुले झाले, आणि स्वस्त आयातीच्या माळा गळ्यात पडल्या. पण आता तो उत्सव संपला आहे. आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर होताच एक कठोर वास्तव समोर आलं—जग पुन्हा कुंपणं उभारत आहे. निर्यात निर्बंध, तंत्रज्ञान नकार, कार्बन कर आणि प्रगत देशांचा अहंकार; या सगळ्यांनी जागतिकीकरणाच्या शवपेटीवर शेवटची कील ठोकली आहे. आणि भारत? तो अजूनही ‘विचार करू या’ या मूडमध्ये असेल, तर वेळ हातातून निसटेल. सर्वेक्षणाचं वाक्य थेट छातीत घुसतं—“हे एकाच वेळी मॅरेथॉन आणि स्प्रिंट धावण्यासारखं आहे.” म्हणजे श्वास सांभाळत धावायचं आणि तरीही वेग कमी करायचा नाही. वेळ नाही, सबबी नाहीत, संधी दुसऱ्यांदा येत नाही.
आज कच्चा माल, तंत्रज्ञान आणि बाजारपेठा या सहज मिळणाऱ्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. कालपर्यंत मुक्त व्यापाराची शिकवण देणारेच देश आज दरवाजे बंद करत आहेत. चीन, अमेरिका, युरोप—सगळे आपापल्या उद्योगांना कवेत घेत आहेत. अशा वेळी ‘स्वदेशी’ हा घोषवाक्यापुरता विषय राहू शकत नाही. आर्थिक सर्वेक्षण सांगतं—स्वदेशी हे संरक्षणात्मकही आहे आणि आक्रमकही. बाहेरून धक्का बसला, तरी उत्पादन थांबू नये; आणि दीर्घकाळात देशाची क्षमता इतकी मजबूत व्हावी की कुणाच्या परवानगीची गरजच पडू नये. मात्र इथेही अत्रे टोचणी देतात—स्वदेशी म्हणजे डोळे झाकून आयात-प्रतिस्थापन नव्हे. प्रत्येक आयात वाईट नाही, आणि प्रत्येक स्वदेशी पवित्रही नाही. स्पर्धात्मकता वाढेल, अशी शिस्तबद्ध रणनीती हवी; नाहीतर ‘स्वदेशी’च्या नावाखाली निकृष्टपणाचं स्वातंत्र्य मिळेल.
सर्वेक्षण शेतकऱ्यांपासून उद्योगांपर्यंत थेट प्रश्न विचारतं. युरियाच्या किमतीत मर्यादित वाढ करा, पण त्याच पैशाचं थेट रोख हस्तांतरण द्या—म्हणजे खतही सुधरेल आणि शेतकरीही. औद्योगिक क्लस्टर उभे राहिले, पण अजूनही ते जागतिक स्पर्धेत तोकडे आहेत—हे मान्य करण्याचं धैर्य दस्तऐवजात आहे. अमेरिकेसोबतचा करार याच वर्षी होईल, अशी आशा आहे; पण करार म्हणजे रामबाण नाही. आणि शेवटी, आरटीआय कायद्याचा पुनर्विचार—हा मुद्दा तर थेट व्यवस्थेच्या नाडीवर बोट ठेवतो. पारदर्शकता हवीच; पण कारभार ठप्प होईल, इतकी उघडझापही नको. एकूण काय, आर्थिक सर्वेक्षण भारताला आरसा दाखवतं—जागतिकीकरणाचा पडदा पडला आहे. आता भारताने प्रेक्षक बनून टाळ्या वाजवायच्या नाहीत; रंगमंचावर उतरून वेगाने धावायचं आहे. कारण या शर्यतीत थांबलेला देश इतिहासात धूळ खात पडलेला दिसतो!
