![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १७ फेब्रुवारी २०२६ || पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किलोमीटर लांबीच्या ‘रेड लाइन’ मेट्रो (मेट्रो लाइन ३) मार्गाच्या सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून एप्रिल अखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने प्रवासी सेवा सुरू करण्याचे नियोजन Pune Metropolitan Region Development Authority (पीएमआरडीए)ने केले आहे. या मार्गामुळे हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये ये-जा करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. सध्या या परिसरात होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. मेट्रो सुरू झाल्यानंतर वेळेची मोठी बचत होऊन प्रवासाचा ताण कमी होणार आहे.
पीएमआरडीएकडून या उन्नत मार्गावर दोन्ही दिशांनी मेट्रोची चाचणी घेण्यात आली. प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के स्थापत्य काम पूर्ण झाले असून व्यावसायिक सेवा सुरू करण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सर्व स्थानके एकाच वेळी सुरू न करता, ज्या स्थानकांचे काम पूर्णत्वास गेले आहे ती प्रथम प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहेत. उर्वरित स्थानके काम पूर्ण होताच सुरू करण्यात येतील. त्यामुळे एप्रिलपासून पुणेकरांना प्रत्यक्ष मेट्रो प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
दरम्यान, गणेशखिंड रस्त्यावरील दुमजली उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून विद्यापीठ चौकातील ‘बॉटलनेक’ समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा आहे. औंध–शिवाजीनगरदरम्यानचा मार्ग आधीच कार्यान्वित आहे आणि उर्वरित जोडरस्ते सुरू झाल्यामुळे बाणेर, पाषाण व औंध परिसरातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाजीनगर येथे ही ‘रेड लाइन’ विद्यमान Maha Metro संचलित ‘ॲक्वा’ आणि ‘पर्पल’ लाइनशी जोडली जाणार आहे. त्यामुळे शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अखंड, सुसंगत आणि जलद प्रवासाची सुविधा पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
