म्हाडा मोरवाडीत ई-श्रम कार्डचा मेळा! आर्थिक साक्षरतेचीही उजळणी

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २४ फेब्रुवारी २०२६ | म्हाडा मोरवाडी येथे सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राबवत फ्युजन पार्क, ऑफिस क्र. २० मध्ये मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सिनर्जी आणि महिंद्रा फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने, सौ. रेणुका भोजने यांच्या पुढाकारातून महिला व पुरुषांसाठी हे शिबिर पार पडले. असंघटित क्षेत्रातील कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने ई-श्रम (E-Shram) कार्ड मोफत काढून देण्यात आले. परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शिबिराला सामाजिक उपक्रमाचे स्वरूप लाभले.

या उपक्रमात केवळ कार्ड नोंदणीपुरतेच मर्यादित न राहता महिलांसाठी आर्थिक साक्षरतेचे (Financial Literacy) मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. बचत, गुंतवणूक, विमा, कर्ज व्यवहारातील दक्षता अशा मुद्द्यांवर सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांना ‘डिजी लॉकर’ ॲप उघडून देण्यात आले. या ॲपमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, गुणपत्रिका, ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी शासकीय कागदपत्रे सुरक्षितपणे डिजिटल स्वरूपात साठवता येतात, याची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. डिजिटल सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल विशेष ठरले.

शिबिरात सुमारे ७५ ते ८० महिला व पुरुष सहभागी झाले होते. सहभागी नागरिकांना मोफत गिफ्ट व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मल्हार आर्मीचे शहराध्यक्ष दिपक भोजने उपस्थित होते. तसेच हनुमंत ढिकले सर यांनी ई-श्रम योजनेचे फायदे व शासनाच्या विविध योजनांची माहिती देत हा उपक्रम इतर महिलांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. सामाजिक जाणीव, आर्थिक सक्षमीकरण आणि डिजिटल जागरूकता यांचा संगम घडवणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *