![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २४ फेब्रुवारी २०२६ | IndiGo Kolhapur to Mumbai flight schedule 29 March : व्यवसाय, उद्योग, शासकीय कामकाज आणि वैद्यकीय कारणांसाठी एका दिवसात मुंबई गाठून संध्याकाळी परतण्याची सोय आता प्रत्यक्षात येत आहे. २९ मार्चपासून IndiGo कडून कोल्हापूर–मुंबई–कोल्हापूर या मार्गावर दररोज दिवसातून दोन वेळा विमानसेवा सुरू होत असून, बुकिंगलाही प्रारंभ झाला आहे. ‘एका दिवसात ये-जा’ हीच या सेवेमागची प्रमुख ताकद मानली जात आहे. सकाळच्या उड्डाणाने मुंबईत पोहोचून दिवसभरातील बैठक, शासकीय कामे किंवा रुग्णालयीन भेटी आटोपून रात्री परतीच्या फ्लाइटने कोल्हापूरला परतणे शक्य होणार आहे. त्यामुळे रेल्वे वा रस्तेमार्गावरील दीर्घ प्रवासाचा पर्याय टाळून वेळ आणि श्रमांची मोठी बचत होईल.
या मार्गावर यापूर्वी Star Air ची सेवा उपलब्ध होती; मात्र वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर उड्डाणांची वारंवारता वाढवण्याची मागणी जोर धरत होती. नवीन वेळापत्रकानुसार सकाळी आणि सायंकाळी अशी दोन फेऱ्या राहणार आहेत. नवी मुंबई–कोल्हापूर सकाळी ८:०० ते ९:१५, कोल्हापूर–नवी मुंबई ९:३५ ते १०:३५; तसेच सायंकाळी नवी मुंबई–कोल्हापूर ७:२० ते ८:३० आणि कोल्हापूर–नवी मुंबई ८:५० ते ९:५० अशी उड्डाणे असतील. सलग सातही दिवस ही सेवा उपलब्ध राहणार असल्याने उद्योग, आयटी क्षेत्र, पर्यटन आणि धार्मिक प्रवासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
“कोल्हापूरहून मुंबईला जाऊन एका दिवसात काम पूर्ण करून परत येणे हीच मोठी गरज होती. आता ती प्रभावीपणे पूर्ण होत आहे. अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठीही ही सेवा सोयीची ठरेल,” असे ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष बळीराम वराडे यांनी सांगितले. तर खासदार धनंजय महाडिक यांनी, “कोल्हापूरकरांची प्रदीर्घ मागणी पूर्ण झाली. सातत्याने पाठपुरावा केल्याचे फलित म्हणजे ही दैनंदिन आणि सोयीस्कर सेवा,” असे नमूद केले. नव्या विमानसेवेने कोल्हापूरचा मुंबईशी हवाई दुवा अधिक मजबूत होत असून, प्रादेशिक विकासाला नवे पंख लाभणार आहेत.
