![]()
जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर परिणाम; गुंतवणूकदारांची सावध पावले, दरात मोठी घसरण
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जुलै २०२६ ।। सराफा बाजार म्हणजे कधी आभाळाला भिडणारे दर, तर कधी क्षणार्धात खाली येणारे भाव. गेल्या काही दिवसांत विक्रमी उंची गाठलेल्या सोन्या-चांदीने आता अचानक उतरणीचा रस्ता धरला आहे. गुरुवारी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात लक्षणीय घसरण नोंदवली गेली. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम सुमारे १ लाख ४३ हजार ८९० रुपयांवर आला, तर चांदीचा भाव प्रति किलो २ लाख २३ हजार रुपयांपर्यंत खाली घसरला. बाजारात दररोज बदलणारे आकडे हे केवळ मागणी-पुरवठ्याचे गणित नसते; त्यामागे जागतिक राजकारण, आर्थिक धोरणे आणि गुंतवणूकदारांच्या मनातील भीती यांचाही मोठा वाटा असतो.
अमेरिका-इराण संबंधांतील वाढता तणाव आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचवेळी अमेरिकेतील आर्थिक धोरणांबाबतही अनिश्चितता कायम आहे. जागतिक कमोडिटी बाजारात या घडामोडींचा थेट परिणाम दिसून आला. आंतरराष्ट्रीय कॉमेक्स बाजारात सोन्याच्या दरात सुमारे ०.३७ टक्क्यांची घसरण होऊन भाव ४,०६७ डॉलर प्रति औंसवर आले, तर चांदीचा दर ०.८५ टक्क्यांनी घसरून ५८.०४५ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होता. या बदलांचे पडसाद भारतीय बाजारातही उमटले आणि सराफा बाजारात दर घसरले.
देशांतर्गत एमसीएक्समध्येही सोन्याचे व्यवहार १.४३ ते १.४४ लाख रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर झाले, तर चांदीचा दर २.२३ ते २.२५ लाख रुपये प्रति किलोदरम्यान राहिला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या ताज्या बैठकीनंतर व्याजदर तातडीने कमी करण्याची शक्यता नसल्याचे संकेत मिळाल्याने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. व्याजदर दीर्घकाळ उच्च पातळीवर राहू शकतात, या अपेक्षेमुळे अनेकांनी सोन्या-चांदीऐवजी सरकारी रोखे आणि इतर सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे मोर्चा वळविला आहे. परिणामी मौल्यवान धातूंवरील मागणी कमी होऊन त्यांच्या किमतींवर दबाव वाढला आहे.
बाजाराचा स्वभाव हा क्षणाक्षणाला रंग बदलणाऱ्या गिरगिटासारखा असतो. आज घसरलेले दर उद्या पुन्हा उसळी घेतीलच, याची शाश्वती नसते आणि आणखी खाली जातील, असेही ठामपणे सांगता येत नाही. तज्ज्ञांच्या मते, मध्यपूर्वेतील तणाव, कच्च्या तेलाच्या किमती, डॉलरची ताकद आणि अमेरिकन फेडचे पुढील व्याजदर धोरण यावरच सोन्या-चांदीचा पुढील प्रवास अवलंबून असेल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अफवांवर नव्हे तर बाजारातील अधिकृत संकेत आणि दीर्घकालीन आर्थिक चित्र लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. सराफा बाजारात आजची घसरण ही शेवटची ठरणार की नव्या चढ-उतारांची सुरुवात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.