![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ मार्च २०२६ ।। राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची असलेल्या Ladki Bahin Yojana संदर्भात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नसल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मार्च महिना सुरू होऊनही पैसे न आल्यामुळे यावेळी फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र दिला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
मागील काही महिन्यांपासून या योजनेचा हप्ता उशिराने जमा होत असल्याचे चित्र आहे. अनेक वेळा मागील महिन्याचा हप्ता पुढील महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत दिला जातो. त्यामुळे यावेळीही फेब्रुवारीचा हप्ता मार्च महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी लाभार्थ्यांना दोन हप्ते एकत्र दिल्याचा अनुभव असल्यामुळे यावेळीही १५०० रुपयांऐवजी ३००० रुपये मिळतील का, याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांनी ई-केवायसी (eKYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा योजनेचा लाभ मिळण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.
