गुजरातच्या वाऱ्यांचा महाराष्ट्रावर तडाखा; पुढील 24 तास उकाडा वाढणार, 50 किमी वेगाने वारे

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ मार्च २०२६ ।। राज्यातील उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून येत्या २४ तासांत उकाडा आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे गुजरात आणि राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या अँटी सायक्लोनमुळे गरम वारे महाराष्ट्राकडे वळले आहेत. या वाऱ्यांचा परिणाम मुंबई, ठाणे, कोकणासह विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जाणवत असून नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे हवेत आर्द्रतेचे प्रमाण घटले असून उकाडा अधिक तीव्र झाला आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे. मंगळवारी मुंबईत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले गेले, तर ठाण्यात पारा ४० ते ४१ अंशांच्या घरात पोहोचला. दुपारच्या वेळेत सूर्याचा तडाखा अधिक जाणवत असून रात्रीच्या तापमानातही फारशी घट होत नाही. त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जाणवू लागली आहे. हवामान खात्याने गरज असल्यासच दुपारी ११ ते ४ या वेळेत घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, देशाच्या इतर भागांमध्येही हवामानात बदलाचे संकेत दिसत आहेत. India Meteorological Department ने बिहार आणि झारखंडसह पूर्व भारतात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी वादळासह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर १४ आणि १५ मार्च रोजी विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वातावरणात तयार होत असलेल्या बदलांमुळे वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसू शकतो, असा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे उकाड्याच्या झळा सहन करत असतानाच राज्यातील काही भागांना अवकाळी पावसाचाही फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *