![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ मार्च २०२६ ।। Mumbai-Goa Highway वरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी पुन्हा एकदा डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही त्यावर तीन टोलनाके उभारले जाणार असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाचा असलेला हा मार्ग अपूर्ण अवस्थेत असतानाच टोलवसुलीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार पळस्पे ते इंदापूर या सुमारे ९० किमी अंतरामध्ये खारपाडा आणि खांब येथे दोन टोलनाके प्रस्तावित आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना दुहेरी टोल द्यावा लागणार आहे. याशिवाय लोहारे येथेही टोलवसुलीची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी टोलनाक्यांची उभारणी पूर्ण झाली असून सिग्नल यंत्रणाही सुरू करण्यात आली आहे. मात्र रस्त्याचे अनेक टप्पे अद्याप अपूर्ण असल्याने “रस्ता पूर्ण नाही, तर टोल कसला?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, हा मुद्दा विधानपरिषदेतही गाजला. Milind Narvekar यांनी अपूर्ण कामावर टोलवसुली सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित करत ती तातडीने थांबवण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना Indranil Naik यांनी महामार्गाचे काम १२ टप्प्यांत सुरू असल्याचे सांगितले. राष्ट्रीय महामार्ग नियमांनुसार काही भाग पूर्ण झाल्यानंतर टोलवसुली करता येते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
सततची वाहतूक कोंडी, अपूर्ण रस्ता आणि सुविधांचा अभाव यामुळे आधीच त्रस्त असलेल्या प्रवाशांवर आता टोलचा अतिरिक्त भार येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
