![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ मार्च २०२६ ।। पिंपरी-चिंचवड शहराची ओळख एकेकाळी राहण्यायोग्य आणि आल्हाददायक वातावरण असलेल्या शहरांमध्ये होती. मात्र, झपाट्याने वाढणारे शहरीकरण, बांधकामांचा वेग आणि वृक्षतोड यामुळे आता या उद्योगनगरीची हवा दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. ‘जागतिक हवामान दिना’च्या निमित्ताने समोर आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन महिन्यांत नागरिकांना केवळ १५ दिवसच शुद्ध हवा मिळाली आहे. उर्वरित काळात हवा मध्यम किंवा त्यापेक्षा अधिक प्रदूषित राहिल्याने शहराच्या पर्यावरणीय स्थितीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
हिंजवडी आयटी पार्कमुळे ‘आयटी नगरी’ म्हणून नावारूपाला आलेल्या या शहरात रोजगाराच्या संधी वाढल्या, लोकसंख्या वाढली आणि विकासाला वेग आला. मात्र, या विकासाची मोठी किंमत शहराला पर्यावरणाच्या स्वरूपात मोजावी लागत आहे. रस्त्यांची खराब अवस्था, सततची खोदकामे, वाढती वाहने, बांधकामांची धूळ आणि हरित क्षेत्राचा अभाव यामुळे हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल ६६ दिवस हवा ‘मध्यम प्रदूषित’ श्रेणीत राहिल्याचे आकडे सांगतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा हवेत दीर्घकाळ राहिल्यास श्वसनाचे त्रास, अस्थमा आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
याचबरोबर तापमानातही लक्षणीय वाढ होत आहे. मार्च महिन्यातच तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे, जे पूर्वी क्वचितच पाहायला मिळत होते. काँक्रीटचे वाढते जाळे, कमी होत चाललेली झाडे आणि हवामानातील असमतोल यामुळे पावसाच्या पॅटर्नमध्येही बदल दिसू लागले आहेत. कमी वेळात अतिवृष्टी होण्याच्या घटना वाढल्या असून, शहराच्या पायाभूत सुविधांवर त्याचा ताण येत आहे. एकूणच, पिंपरी-चिंचवडमधील हवेची गुणवत्ता आणि हवामानातील बदल ही केवळ पर्यावरणाची नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्याचीही गंभीर समस्या बनत चालली आहे.
