![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ मार्च २०२६ ।। आखाती देशांतील युद्धामुळे सोन्या-चांदीच्या किमती गगनाला भिडतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात असतानाच बाजाराने मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून, सोन्याचे दर थेट दीड लाखांच्या खाली आले आहेत. मागील तीन आठवड्यांतच सोनं तब्बल ३३ हजार रुपयांनी स्वस्त झाल्याने सराफा बाजारात ग्राहकांची झुंबड उडाली आहे. पुणे, मुंबई, जळगावसह देशातील प्रमुख शहरांमध्ये खरेदीसाठी गर्दी वाढली असली, तरी हीच योग्य वेळ आहे का, हा प्रश्न मात्र गुंतवणूकदारांसमोर उभा राहिला आहे.
मार्चच्या सुरुवातीला २४ कॅरेट सोन्याने प्रति तोळा १.७३ लाखांचा उच्चांक गाठला होता. मात्र, त्यानंतर दर घसरत जाऊन आता १.४० लाखांच्या आसपास स्थिरावले आहेत. म्हणजेच जवळपास १९ टक्क्यांची घसरण झाली आहे. चांदीच्या दरातही मोठी पडझड झाली असून, केवळ दोन दिवसांतच सुमारे २५ हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. या घसरणीमागे अनेक जागतिक कारणांचा प्रभाव दिसून येतो. अमेरिका-इराण तणाव कमी होण्याचे संकेत, कच्च्या तेलाच्या किमतीत स्थिरता, तसेच गुंतवणूकदारांचा कल शेअर बाजाराकडे वळणे यामुळे सोन्यावरचा दबाव वाढला आहे.
तज्ज्ञांच्या मते, सध्याची घसरण ही ‘करेक्शन’ मानली जात असून, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही संधी असू शकते. मात्र, अजूनही जागतिक परिस्थिती अनिश्चित असल्याने दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्याजदर वाढीची शक्यता, डॉलरमधील चढ-उतार आणि जागतिक बाजारातील अस्थिरता यावर सोन्याचे भाव अवलंबून राहतील. त्यामुळे एकदम मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने खरेदी करणे हा अधिक सुरक्षित पर्याय ठरू शकतो. एकूणच, ‘स्वस्त झालं म्हणून लगेच खरेदी’ करण्याऐवजी विचारपूर्वक निर्णय घेणं हेच सध्याच्या परिस्थितीत शहाणपणाचं ठरणार आहे.
