![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ मार्च २०२६ ।। सोन्याच्या किमती अक्षरशः आभाळाला भिडत असताना ग्राहकांच्या वागणुकीत मोठा बदल दिसू लागला आहे. दागिने खरेदीकडून गुंतवणुकीकडे झुकणारा हा कल आता स्पष्टपणे दिसत असून, सोन्याच्या लगडी, नाणी आणि ‘ETF’मध्ये तब्बल ६० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ICRA आणि ASSOCHAM यांच्या संयुक्त अहवालात ही बाब समोर आली आहे.
एकीकडे दागिन्यांची मागणी घटत असताना, दुसरीकडे ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणून सोन्याला मोठी पसंती मिळत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या सहामाहीत दागिन्यांच्या मागणीत १७ टक्क्यांची घसरण झाली, तर भारतातही साधारण असंच चित्र दिसून आलं. मात्र याच काळात गुंतवणूक म्हणून सोन्याच्या वापरात झपाट्याने वाढ झाली आहे. अनिश्चित जागतिक परिस्थिती, महागाई आणि युद्धजन्य तणावामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारापेक्षा ‘सेफ हेवन’ म्हणून सोन्याचा पर्याय निवडला आहे.
यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे मध्यवर्ती बँकांची मोठ्या प्रमाणात सुरू असलेली सोन्याची खरेदी. त्यामुळे जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतींना मजबूत आधार मिळत आहे. भारतात तर रुपयाच्या अवमूल्यनामुळे सोन्याचे दर आणखी वेगाने वाढले आहेत—२०२४ मध्ये १४%, २०२५ मध्ये ३३% आणि २०२६ मध्ये तब्बल ५२% वाढ नोंदली गेली आहे.
👉 थोडक्यात, सोनं आता फक्त दागिन्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही—तर ते गुंतवणुकीचं ‘सर्वात सुरक्षित हत्यार’ बनत चाललं आहे.
