खरात प्रकरणाचा धक्का: रुपाली चाकणकरांचा दुसरा राजीनामा; राजकारणात खळबळ, सुनेत्रा पवारांची निर्णायक चाल

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मार्च २०२६ ।। भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्यातील राजकारणाला अक्षरशः हादरा दिला असताना त्याचे पडसाद आता थेट सत्ताधारी वर्तुळात उमटताना दिसत आहेत. या प्रकरणाशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आधीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या रुपाली चाकणकर यांनी आता राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला. मागील काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती आणि अखेर त्यांनी हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करताना चाकणकर यांनी आपण खरातच्या कोणत्याही गैरकृत्यात सहभागी नसल्याचे ठामपणे सांगितले आहे. “माझा त्याच्या आर्थिक व्यवहाराशी किंवा कोणत्याही चुकीच्या कृत्याशी संबंध नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, कोणतेही ठोस पुरावे नसताना माध्यमांमधून होणारे आरोप वेदनादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणाची चौकशी पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावी, अशी मागणी त्यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पोलीस प्रशासनाकडे केली होती. अखेर आज सकाळी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी पक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले.

या आधीच विरोधकांकडून चाकणकर यांच्यावर सातत्याने दबाव टाकला जात होता. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊनही पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर पक्षांतर्गत बैठकीतही अनेक आमदारांनी राजीनाम्याची मागणी लावून धरल्याची माहिती समोर आली होती. अखेरीस या सर्व घडामोडींनंतर चाकणकर यांनी पदाचा राजीनामा देत राजकीय वादळाला तात्पुरता विराम दिला असला, तरी खरात प्रकरणाचे पडसाद अजून किती दूरपर्यंत जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *