Video : काळोख, रक्तपात आणि गूढ रहस्यांचा थरार; ‘सालबर्डी’चा जबरदस्त टीझर प्रदर्शित

Spread the love

Loading

 

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ एप्रिल २०२६ ।। पुणे – मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषयांवरील चित्रपटांची रेलचेल सुरू असतानाच आता आणखी एक थरारक आणि गूढरम्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सालबर्डी’ या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यातील काळोख, भीती आणि रक्तरंजित घटनांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

टीझरची सुरुवातच भयावह संगीताने होते. अंधारात एक लहान मुलगा टॉर्चच्या प्रकाशात काहीतरी शोधताना दिसतो आणि त्यानंतर गावात घडणाऱ्या रहस्यमय घटनांची मालिका उलगडू लागते. “गेल्या काही महिन्यांपासून गावात घडणाऱ्या घटना अत्यंत भयानक आहेत,” असा आवाज ऐकू येताच वातावरण अधिकच तणावपूर्ण बनते.

पुढील दृश्यांमध्ये शाळेत जाणारी मुले, अचानक घडणारे रक्तपात, पाण्यात बुडणारी मुलगी आणि संशयास्पद मृत्यू यांची झलक दाखवण्यात आली आहे. गावात भीतीचे सावट पसरले असून, परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसही घटनास्थळी दाखल झाल्याचे दिसते.

या चित्रपटात अनिल नगरकर, ओंकार भोजने, रोहित कोकाटे, प्रवीण डाळिंबकर, कमलाकर सातपुते, अंशुमन विचारे, चित्तरंजन गिरी, माधव अभ्यंकर आणि शशांक शेंडे यांसारखे दमदार कलाकार झळकणार आहेत. सर्व कलाकारांचे वेगवेगळे लूक आणि तीव्र भावनांनी भरलेली दृश्ये टीझरमध्ये प्रभावीपणे सादर करण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे, टीझरच्या शेवटी एक महिला पोलिस अधिकारी दिसते, मात्र तिचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे ही भूमिका नेमकी कोण साकारणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘सत्य घटनेमागील सत्य – सालबर्डी’ असा आशय टीझरमध्ये अधोरेखित करण्यात आला असून, हा चित्रपट वास्तव घटनांवर आधारित असल्याचे संकेत दिले आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रमेश चौधरी यांनी केले आहे.

एकूणच, गूढ रहस्य, थरार आणि वास्तवाचा संगम असलेला ‘सालबर्डी’ हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता या रहस्यमय कथानकाचा उलगडा मोठ्या पडद्यावर कसा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *