✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ एप्रिल २०२६ ।। मध्यपूर्वेतील तणाव शमत असल्याची आशा निर्माण झाली होती, पण काही तासांतच परिस्थितीने असा पलटी घेतला की जग पुन्हा धास्तावलं. Donald Trump यांनी जाहीर केलेल्या शस्त्रसंधीमुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबेल, असा अंदाज होता. मात्र, या शांततेला मित्रदेश इस्रायल नेच तडा दिल्याचं चित्र समोर आलं. शस्त्रसंधीनंतरही लेबनॉनमध्ये सुरूच राहिलेल्या हल्ल्यांमुळे इराणने संताप व्यक्त करत जगातील सर्वात महत्त्वाचा तेलमार्ग — होर्मुझची सामुद्रधुनी — पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, काही तासांतच जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता पुन्हा वाढली.
होर्मुझचा हा निर्णय म्हणजे केवळ प्रादेशिक प्रतिक्रिया नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेला थेट धक्का आहे. जगातील सुमारे २० टक्के तेल वाहतूक या मार्गातून होते. त्यामुळे या सामुद्रधुनीवर टाळं लागलं की, पेट्रोल-डिझेलपासून गॅसपर्यंत सर्वच ऊर्जा स्रोतांच्या किमती वाढण्याची साखळी सुरू होते. आधीच युद्धामुळे वाढलेले दर आता प्रति बॅरल ९७ डॉलरवर पोहोचल्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर ताण वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, शस्त्रसंधीनंतर काही टँकर्स सुरक्षित बाहेर पडले होते, पण इस्रायलच्या कारवाया वाढताच इराणने पुन्हा नाकेबंदी करत जगाला इशारा दिला— “हल्ले थांबवा, नाहीतर पुरवठा थांबेल!”
या संपूर्ण घडामोडीत सर्वात मोठं राजनैतिक संकट निर्माण झालं आहे. इराणने स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की, इस्रायलने लेबनॉनमधील कारवाया न थांबवल्यास ते शस्त्रसंधी करारातून पूर्णपणे बाहेर पडतील. दुसरीकडे, इस्रायलचा दावा आहे की लेबनॉन हा या कराराचा भागच नाही. त्यामुळे संघर्षाचा कोंडमारा अधिकच वाढला आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सर्वत्र शस्त्रसंधी लागू करण्याची मागणी केली आहे, तर अमेरिकाने इराणचा निर्णय “अस्वीकार्य” ठरवला आहे. आता इस्लामाबाद येथे होणाऱ्या चर्चेकडे जगाचं लक्ष लागलं आहे— कारण इथेच ठरणार आहे, जगाला शांततेचा मार्ग मिळणार की पुन्हा युद्धाची ठिणगी पेटणार!
