महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दुबई – दि. २० सप्टेंबर -:राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबवली, वसई विरार, नाशिक, नगर, सोलापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सिंधुदूर्ग, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि बीड या शहरांमधील कोरोना आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विस्तारला आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या पावणेबारा लाखांपर्यंत पोहचली असून मृतांची संख्याही चिंताजनक झाली आहे. आतापर्यंत राज्यातील 32 हजार रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामध्ये लहान मुले, तरुणांसह ज्येष्ठांचा समावेश आहे. या स्थितीचा अंदाज घेत शालेय शिक्षण विभागाने सावध पवित्रा घेत विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या परवानगीने शाळा सुरू करण्याचे नियोजन केले. मात्र, मुलांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने एकाही पालकाने संमतीपत्र दिलेले नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय अद्यापही घेतलेला नाही.
“शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरू’या उपक्रमाअंतर्गत दोन कोटी विद्यार्थ्यांना शिक्षण घरपोच दिले जात आहे. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने अद्याप यंदाचे शैक्षणिक सत्र सुरुच झाले नाही. त्यामुळे दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा लांबणीवर पडणार आहेत. दुसरीकडे राज्यातील कोरोना ससंर्ग कमी न झाल्यास उच्च महाविद्यालयांमधील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच आता दहावी- बरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घरबसल्या ऑनलाइन घेण्याचा विचार पुढे आला आहे.
शैक्षणिक सत्र लांबल्याने परीक्षेच्या वेळापत्रकास अडचणी
कोरोनामुळे 2020- 21 च्या शैक्षणिक सत्राचीच सुरवातच अद्याप झालेली नाही. त्यामुळे दहावी- बारावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची जुलै-ऑगस्टमध्ये होणारी परीक्षा अजून झाली नाही. शैक्षणिक सत्र लांबणीवर पडल्याने फेब्रुवारी- मार्च 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रकही ठरलेले नाही. कोरोनाचा संसर्ग असाच राहिल्यास नियोजन करावे लागेल.
– शंकुतला काळे, अध्यक्ष, पुणे बोर्ड