✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ एप्रिल २०२६ ।। रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची धावपळ, कागदपत्रांचा त्रास आणि मंजुरीसाठी लागणारा वेळ—आता हे सगळं इतिहासजमा होणार आहे! Mukhyamantri Sahayata Nidhi संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या ऑनलाइन प्रणालीमुळे उपचारांसाठी लागणारी आर्थिक मदत आता अवघ्या ८ तासांत मंजूर होणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी रुग्णांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना कुठलाही अर्ज भरावा लागणार नाही—रुग्णालयच थेट अर्ज सादर करणार! या अत्याधुनिक प्रणालीचे उद्घाटन लवकरच मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या नव्या व्यवस्थेमुळे ‘रुग्णकेंद्रित’ सेवा प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न होत आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली की, संबंधित रुग्णालय प्रशासनच मदतीसाठी अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारे पाठवणार आहे. सर्व कागदपत्रे नियमांनुसार पूर्ण असल्यास, केवळ कार्यालयीन ८ तासांत अर्ज मंजूर होईल. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचार विलंब न होता तातडीने सुरू करता येणार आहेत. या प्रक्रियेमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक आणि मानसिक दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेतला जात असल्याचे आकडे सांगतात. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान तब्बल ४०,७७६ रुग्णांना सुमारे ३३३ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंड प्रत्यारोपण, डायलिसिस, अपघात, मेंदूविकार अशा ११ गंभीर आजारांसाठी ही मदत दिली जाते. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ‘वेळेत उपचार, वेळेत मदत’ हा नवा मंत्र राबवला जात असून, गरजूंसाठी ही योजना खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे.
