महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. २० सप्टेंबर -:राज्यात शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण-गोव्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. दरम्यान येत्या बुधवार (ता.23) पर्यंत दक्षिण कोकण, गोव्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार रविवारी (ता. 20) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून, त्यामुळे पुढील 24 तासांमध्ये त्याची तीव्रता वाढणार आहे. परिणामी येत्या तीन दिवसांमध्ये कोकण गोव्यात जोरदार, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही त्यांनी दिला आहे. शनिवारी राज्यात सरासरी 7.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टी लगत सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता हवमान खात्याने वर्तवली आहे. मंगळवारपर्यंत (ता.22) ही स्थिती अशीच राहणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाने उघडीप घेतली होती. मात्र शनिवारी दुपारनंतर शहरातील विविध भागांमध्ये ढगाळ वातावरणाची निर्मीती झाली. बघता बघता पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांचा विकेंड पावसामध्येच गेला. शनिवारी शहरात सकाळपासूनच उन सावलीचा खेळ सुरू होता. परंतु दुपारपर्यंत ढग भरून आले आणि पावसाने काही वेळातच पुन्हा शहरात हजेरी लावली.
काही ठिकाणी मेघगर्जनांसह जोरदार पाऊस सुरू झाला. तर काही भागांमध्ये रस्त्यावरील पाणी साठले. त्यामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी पावसापासून सुटकेसाठी स्टॉपच्या शेडचा आधार घेतला. शनिवारी पुण्यात 14 मिलीमीटर तर लोहगाव येथे 29 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. दरम्यान पुढील सहा दिवस शहरात पावसाची स्थिती कायम राहणार आहे. मंगळवार नंतर पावसाचा जोर कमी होत पावसाच्या हलक्या सरी पडतील असे हवमान खात्याने वर्तविले आहे.