महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – प्रतिज्ञा पवार शेटे- पुणे – दि. २० सप्टेंबर -:या भागात आपण कोरोनाचा संसर्ग जिल्हा, राज्य आणि देशभरात समूह संसर्गाच्या दिशेने कसा वाढत आहे ते आकडेवारीसह पाहू. करोना साथीच्या प्रसाराचे चार टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे बाधित देशातून आलेल्या प्रवाशांना करोनाचा संसर्ग झालेला असणे. या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही करोनाची लागण होते. हा दुसरा टप्पा असून स्थानिक प्रसार (लोकल ट्रान्समिशन)असे म्हणतात. तिसऱ्या टप्प्यात प्रवास न केलेल्या किंवा प्रवाशांच्या संपर्कात न आलेल्या व्यक्तींना संसर्गाची लागण होण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने दिसायला लागते. या टप्प्यात समाजामध्ये संसर्गाचा प्रसार कसा, कुठे आणि कशाप्रकारे होत आहे, याचा माग लावणे कठीण होते. यात एका विशिष्ट भौगोलिक भागामध्ये उदारहणार्थ, विभाग, शहर, जिल्हा यात मोठ्या प्रमाणात असे रुग्ण आढळून येतात. तेव्हा समूह प्रसार झाल्याचे नोंदवले जाते.
करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस राज्यात अधिकच वाढतच आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील करोना रुग्णसंख्येह करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढताना दिसत आहे. शनिवारी ९०३ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ७० हजारांच्या उंबरठ्यावर असून ६९ हजार ४२३ वर पोहचली आहे. यापैकी, ५४ हजार ४३२ जण करोनातून बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ४४४ एवढी आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 93,337 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे भारताल्या आतापर्यंतच्या एकूण कोव्हिड रुग्णांच्या संख्या 53,08,015 वर पोहोचली आहे. भारतामध्ये सध्या 10,13,964 अॅक्टिव्ह केसेस आहेत. कोरोनाग्रस्तांच्या जगभरातल्या आकडेवारीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका पहिल्या तर ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 11,88,015 एवढी झाली आहे.
राज्यात शनिवारी, 19 सप्टेंबरला कोरोनाची लागण झालेले 21,907 नवीन रुग्ण आढळले, तर 23,501 रुग्ण बरे होऊन घरी गेले.
राज्यात मंगळवारी 425 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 72.22 % आहे. सध्या राज्यात 2 लाख 97 हजार 480 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर, राज्यातल्या एकूण मृत्यूचा आकडा 32 हजार 216 वर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यातल्या प्रत्येक दिवशी भारतात 90,000 नवीन रुग्ण नोंदवण्यात आले तर रोज 1,000 पेक्षा जास्त मृत्यू झाले. देशातल्या 7 राज्यांमध्ये संसर्गाचं प्रमाण सर्वाधिक आहे. या राज्यांतली लोकसंख्या देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या 48% आहे.
जगातला सर्वात कठोर लॉकडाऊन भारतात लावण्यात आला. या काळात लोक घरात होते, उद्योग बंद होते आणि असंघटित क्षेत्रातल्या कोट्यवधी कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना पायी चालत वा बस आणि ट्रेननी प्रवास करत गावी परतावं लागलं. पण एकीकडे संसर्गाचं प्रमाण आणि रुग्णसंख्या वाढत असताना अर्थव्यवस्थेचं कामकाज सुरू करणं हे लॉकडाऊनचा बसलेला फटका दर्शवणारं असल्याचं दर्शवत आहे.
लोकसंख्येतल्या बहुसंख्य जणांना एखाद्या विषाणूची लागण होऊन गेली की त्यांच्यामध्ये त्यासाठीची रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते आणि परिणामी या विषाणूचा प्रसार मंदावतो, याला हर्ड इम्युनिटी म्हणतात. जोपर्यंत संसर्ग झपाट्याने पसरतोय, तोपर्यंत अर्थव्यवस्थेत सुधारणा होणार नाही. हॉस्पिटल्स आणि आरोग्य यंत्रणेवरचा वाढीव ताण कायम राहील. “लोकांचं घराबाहेर पडण्याचं वाढणारं प्रमाण, सोशन डिस्टन्सिंग न पाळणं, मास्क वापरातली टाळाटाळ, स्वच्छता यासगळ्या बाबींमुळे व्हायरस पुन्हा डोकं वर काढेल,” असे तज्ञ सांगत असले तरी नागरिकांनी हे नियम पाळणे हे त्यांचे कर्तव्य आहे
तर भारतामध्ये या जागतिक साथीची प्रचंड मोठी लाट येणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संस्थेच्या साथीच्या विकारतज्ज्ञांनी मार्च महिन्यातच दिला होता. देशामधली आरोग्य यंत्रणा खिळखिळी असताना रुग्णसंख्येत वाढ होणं अटळ असल्याचं ते आता सांगतात. देशभरात लॉकडाऊन लावण्यापेक्षा ज्या शहरांमध्ये संसर्गाला सुरुवात झाली आहे, तिथे लॉकडाऊन लावून तो चांगल्या प्रकारे हाताळणं जास्त फायद्याचं ठरलं असतं असं बहुतेक जाणकारांचं मत आहे.