महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – प्रतिज्ञा पवार शेटे- पुणे – दि. २१ सप्टेंबर -:कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर शाळा – कॉलेजेसही बंद झाली. भारतातले प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठ पातळीपर्यंत 33 कोटी पेक्षा जास्त विद्यार्थी सध्या घरी बसून आहेत. जगभरातल्या 70% विद्यार्थ्यांवर या जागतिक साथीचा आणि लॉकडाऊनचा परिणाम झालेला आहे. पण आता लॉकडाऊनचे निर्बंध हळुहळू शिथील करण्यात येतायत आणि आज नऊ राज्यांमध्ये शाळा पुन्हा सुरु शाळा सुरू करण्यात येतेय. मात्र, महाराष्ट्र सरकारने अद्याप शाळा, कॉलेजेस सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. कोरोनाच्या दहशतीमुळे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यास मानसिकदृष्ट्या तयार नाहीत. या संदर्भात देशभरात राज्यात काय घडामोडी चालल्या आहेत याचा आढावा आपण आजच्या भागात घेणार आहोत.
कोरोनामुळे बदललेल्या परिस्थितीत शाळा सुरू झाल्यानंतर शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धतीही बदलतील. शिक्षणासोबतच सोशल डिस्टंन्सिंगही महत्त्वाचं असेल.दुर्गम भागांतल्या मुलांनाही शहरांतल्या मुलांसारख्या सुविधा मिळाव्यात त्यासाठी सरकारने फारसे प्रयत्न केलेले दिसत नाहीत. पण आताची ही परिस्थिती ओढवल्यानंतर आम्ही आमच्या कामाचा वेग वाढवला आणि ऑनलाईन शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असा जरी प्रशासनाकडून दावा करण्यात येत असला तरी केरळमधल्या दहावीत शिकणाऱ्या 14 वर्षांच्या मुलीने ऑनलाईन शिक्षण घेता येत नसल्याने आत्महत्या केली.या मुलीचे वडील रोजंदारीवर काम करतात. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने घरात टीव्ही नाही आणि स्मार्टफोनची सोयही होऊ शकली नाही. स्मार्टफोन नसणं, हे गरीब वर्गापर्यंत शिक्षण न पोहोचण्याचं कारण असू नये असं मत सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रातही परिस्थिती फारशी चांगली नाही.
महाराष्ट्रातील अनेक खेडोपाड्यात अल्पभूधारक, शेतमजूर अशा घटकांच्या मुलांना हे ऑनलाईन शिक्षण मोबाईल, इंटरनेट अशा सुविधा नसल्याने शक्य होत नाही. यावर सध्या तरी पर्याय उपलब्ध नाहीय कारण कोरोना आजाराने आपला विळखा आता महाराष्ट्राच्या गफार्मिं भागालाही घट्ट घातला आहे.
सरकारने वंचितांच्या दृष्टिकोनातून शिक्षणाकडे पाहणं गरजेचं असून सगळ्यांत आधी घर आणि इंटरनेटसारख्या प्राथमिक सुविधा गरीबांना देण्यात याव्यात. परीक्षा कधी होणार आणि मेरिटवर आपल्याला विषय निवडता येणार का याची चिंता सध्या हजारो विद्यार्थ्यांना आहे. दरवर्षीच जून महिन्यात शैक्षणिक वर्षांची सुरुवात होते. त्यामुळे नवीन गणवेश, वह्या, पुस्तके, इतर शैक्षणिक साहित्य खरेदी आणि विक्रीसाठी बाजारपेठा सज्ज असतात. व हे साहित्य खरेदीसाठी होणारी पालकांची, विद्यार्थ्यांची धावपळ हे चित्र आपण आजपर्यंत जूनमध्ये बघत आलो आहोत. परंतु यावर्षी मात्र कोरोनाने याला पूर्णविराम दिला. व उत्साहाने दप्तर पाटीसह शाळेत जाणार्या मुलांना घरातच मोबाईल, संगणकासमोर बसून शिक्षण घ्यायची सक्तीची वेळ आली.कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र सरकारने देशात 4 वेळा लॉकडाऊन घोषित केले. त्याचा परिणाम उदयोग, व्यवसाय, शेती, रोजगार, क्रीडा, शिक्षण यासह अनेक क्षेत्रांवर झाल्यामुळे पुढील अनेकवर्षे जागतिक अर्थव्यवस्थेला ग्रहण लागणार व या जागतिक महामारी संकटाचा सर्वांना सामना करावा लागणार यात शंकाच नाही.
त्यातच चिंतेची बाब म्हणजे शिक्षण क्षेत्रात दररोज शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणार्या नवनवीन बातम्या पसरतांना दिसत आहेत. शाळा कधी सुरू होणार? सुरू झाल्या तर विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करणारी वाहतूक व्यवस्था कशी असेल ?रिक्षा, व्हॅन मध्ये दाटीवाटीने बसणारे विद्यार्थी,तसेच भिन्न भिन्न परिसरातून शाळेत येणारे विद्यार्थी एकत्रित पणे दिवसभर शिकणार, विद्यार्थी संख्येच्या तुलनेने शाळांमध्ये कमी असलेली शौचालये व त्यातील होणारी गर्दी, शाळेतील बैठक व्यवस्था, यातून एकमेकांशी येणारा संपर्क हया सारख्या अनेक गोष्टी विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी सुद्धा घातक ठरणार आहेत. कोरोनाने भयभीत झालेले पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नसल्याने अनेक शिक्षक -पालक संघटना, लोक-प्रतिनिधींनी शाळा सुरू करण्याबाबत तीव्र विरोध दर्शविला व शासनाकडे सुरक्षितपणे शिक्षण घेण्याची मागणीही केली. त्यामुळे आता सप्टेंबर संपत आला असला तरी दरवर्षीप्रमाणे शाळा सुरू न करता ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवावे असे विचार लोकांकडून मांडले जात आहेत. ऑनलाईन शिक्षणाची ही नवीन पद्धत मुलांच्या दृष्टीने साधक ठरणार का बाधक? हा विषय आज चर्चेचा ठरतोय अशा अनेक समस्यांनी पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले दिसते.
सध्या कोरोना संकटात ऑनलाईन शिक्षण प्रकियेचा वेगाने प्रसार होतांना दिसतो. शिक्षण प्रकियेतील बदलाचे हे नवे संकेत म्हणावे लागतील.आज सर्वच शाळा महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण किती दिवस बंद ठेवणार ? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्राप्त परिस्थितीनुसार आज अनेक संस्था, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस यांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय शोधून विविध अॅप, व्हिडिओ, मार्फत ऑनलाईन शिक्षण सुरू केलेले दिसत आहे.जागतीक संकटाच्या या काळात पर्याय म्हणून स्वीकारलेल्या ऑनलाईन शिक्षण संधीचा सकारात्मक विचार केल्यास, विद्यार्थी एका क्लिकवर हवी ती माहिती हव्या त्या वेळेस पुन्हा पुन्हा मिळवू शकतो. आपल्या गरजेनुसार इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळे अॅप, संकेतस्थळे, यू-ट्यूब चॅनल या माध्यमांद्वारे अमर्याद शैक्षणिक माहिती मिळवून आपले ज्ञान व कौशल्य विकसित करतांना दिसतो. खरं तर मोबाईल व संगणकाचा शिक्षणात वापर या आधी विद्यार्थी करत होतेच, पण तो वेगळ्या पद्धतीने व फारच कमी प्रमाणात! पण आता आपण ज्या नवीन ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा विचार करत आहोत, त्यात विद्यार्थी शिक्षक आणि पालक या तिघांचाही फार मोठा सहभाग असायला हवा. कारण अशा प्रकारच्याशिक्षण पद्धतीत पालकांनाही खूप सतर्क राहावे लागेल. मुलांना स्क्रीनसमोर परिपूर्ण पोशाख किंवा शाळेच्या गणवेशातच बसण्याची सक्ती करावी. तसेच मुले लक्षपूर्वक प्रत्यक्षपणे लेक्चर अटेंड करत आहे की, नुसतीच स्क्रीन सुरू ठेऊन दुसरेच काही उदयोग करत आहेत याकडेही पालकांनीच काटेकोरपणे सतत लक्ष द्यायला हवे.
शिक्षकांनीही ऑनलाईन शिक्षण प्रभावी होण्यासाठी प्रचलित शिक्षण पद्धती व ऑनलाईन शिक्षण याची सांगड घालून अध्यापन करावे . वेगवेगळ्या घरात मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकासमोर बसून अध्ययन करणार्या विद्यार्थ्यांचे वेळोवेळी नाव उच्चारावे, तर कधी त्यांच्या सहभागातील स्पर्धा, काही सामूहिक प्रसंग, स्नेहसंमेलन यातील आठवणींचा उजाळा करून देत, वेगवेगळे दाखले देऊन ऑनलाईन क्लासमध्ये त्यांना मनाने एकत्र आणण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांचे छोटे छोटे गट करून त्यांना आपापल्या विषयानुसार छोटे प्रकल्प द्यावेत व ते प्रकल्प सर्वांसमोर स्क्रीनच्या माध्यमातून शेयर करायला सांगून त्यांचे कौतुकही करावे.विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त स्क्रीनद्वारे केक, फुले या इमेज पाठवून शुभेच्छा द्याव्यात, यामुळे ऑनलाईन शिक्षण एकतर्फी न राहता आनंददायी होईल. आणि हे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांच्या मनावर कोणत्याही प्रकारचे दडपण, ताण राहणार नाही. विद्यार्थ्यांना विशिष्ट वेळ देऊन चॅट पध्दतीने किंवा अॅपमधील माईक सुविधेद्वारे प्रश्न विचारण्याची संधी द्यावी. शिक्षण प्रकियेत शिक्षक व विद्यार्थी यांचा सुसंवाद खूप महत्त्वाचा असतो, यामुळे शिक्षकांचे अध्यापन मुलांना एखाद्या कॅसेटमधील प्रवचन ऐकल्यासारखे वाटणार नाही.
भारतीय मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण -प्रक्रिया नवीन असल्याने शाळा, शिक्षक यांनी उत्तम व गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे व मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची पुरेपूर काळजी घ्यावी. नेत्रतज्ज्ञांच्यामते मोबाईल, संगणक, आयपॅड स्क्रीनचा सतत वापर केल्यास दृष्टिदोषांची समस्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम तर होणार नाही हाही विचार ऑनलाईन शिक्षणाच्या मागे धावताना सर्वांनीच करावा. व त्यादृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी. शक्यतो विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार कमीतकमी स्क्रीन टाईम निश्चित करावा.
ऑनलाईन शिक्षण पद्धतीस पसंती व विरोध दर्शविणारे शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, पालक, विविध संघटना या दोन गटांचे वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत, कारण ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा संगणक तसेच वेगवान इंटरनेट प्रणाली आवश्यक आहे. बहुतांश पालकांकडे ही साधने नाहीत त्यामुळे शहरापासून ते ग्रामीण खेड्यापाड्यातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत ही साधने, सुविधा कशाप्रकारे उपलब्ध करून देता येतील व त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थी कसा घेऊ शकतील हा विचार सर्वप्रथम होणे महत्त्वाचे आहे. शहरी असो वा ग्रामीण भाग त्यातील बहुतेक पालक वर्ग नोकरी, मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. लॉकडाऊनमुळे तर आज अशा कष्टकरी, कामगार वर्गाच्या पालकांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. अशातच ते ऑनलाईन शिक्षणाचे साहित्य घेऊ शकणार नाही. यामुळे साहजिकच त्याची मुले शिक्षणापासून वंचित राहतील. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्काचे काय? असे पालक, विद्यार्थी यांची मानसिकता जाणून त्यांच्या हिताचे निर्णय घेणे हे सर्व शिक्षा अभियानाच्या दृष्टीने महत्वाचे ठरेल.पण ज्या देशातल्या विद्यार्थ्यांची संख्या ही अमेरिकेच्या लोकसंख्येइतकी आहे, जिथली सुमारे 65% लोकसंख्या तरूण आहे, तिथे त्यांच्या शिक्षणाला कोणत्याही सरकारने प्राधान्य दिलेलं नाही. यासाठीची अर्थसंकल्पात मोठी तरतूदही केली जात नाही. अशा परिस्थितीत कोरोनाचं हे आव्हान विद्यार्थ्यांसाठी संधी ठरणार की पुढे जाण्याच्या संधी भविष्यात कमी होणार, हे अजून स्पष्ट नाही.