✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० एप्रिल २०२६ ।। पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्यातून एक नाव पुन्हा जोरात चर्चेत आले आहे—ज्येष्ठ कामगार नेते केशव घोळवे. कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणाऱ्या या नेतृत्वाला भारतीय जनता पक्षाने येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी ठाम मागणी आता कामगार वर्गातून पुढे येत आहे. संघटनात्मक ताकद, सामाजिक बांधिलकी आणि प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव या तिन्ही गोष्टींचा संगम असलेले नेतृत्व म्हणून घोळवे यांच्याकडे पाहिले जात आहे. “कामगारांचा माणूस विधान परिषदेत गेला पाहिजे,” अशी भावना औद्योगिक क्षेत्रात स्पष्टपणे उमटताना दिसत आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वर आलेल्या केशव घोळवे यांचा प्रवास प्रेरणादायी मानला जातो. उसतोड मजूर कुटुंबातून आलेल्या घोळवे यांनी शिक्षणासाठी लहानपणी विविध कष्टाची कामे केली. आयटीआयचे शिक्षण पूर्ण करून वेल्डर म्हणून त्यांनी औद्योगिक क्षेत्रात प्रवेश केला. संघर्षाच्या वाटेवर चालत १९९८ मध्ये थरमॅक्समध्ये कायम नोकरी मिळाली आणि तिथूनच त्यांच्या कामगार नेतृत्वाची खरी सुरुवात झाली. थरमॅक्स कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ‘कायझेन’, ‘5S’, ‘TPM’, ‘TQM’ यांसारख्या आधुनिक व्यवस्थापन तत्त्वांचा वापर करून उत्पादनक्षमता वाढवली, अपव्यय कमी केला आणि कामगार-व्यवस्थापन संबंध सुधारले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेला ISO 9001 प्रमाणपत्र मिळाले, ही त्यांची मोठी कामगिरी मानली जाते.
२००४ मध्ये ‘श्रमिक एकता महासंघ’ स्थापन करून त्यांनी १५० हून अधिक लहान-मोठ्या संघटनांना एकत्र आणले. इटली, जर्मनी, फ्रान्स आणि स्पेनसारख्या देशांत अभ्यासदौरे करून त्यांनी जागतिक औद्योगिक पद्धतींचा अभ्यास केला. नंतरच्या काळात प्रतिकूल परिस्थितीत नोकरी गमावली, पण हार न मानता त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत उडी घेतली आणि नगरसेवक म्हणून विजय मिळवला. उपमहापौर म्हणूनही त्यांनी शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. दिव्यांगांसाठी सुविधा, आशा सेविकांचे मानधन, किमान वेतनाची अंमलबजावणी, शिक्षण सेवकांचे प्रश्न—अशा अनेक सामाजिक विषयांवर त्यांनी ठोस भूमिका घेतली. त्यामुळेच आज कामगार वर्ग म्हणतोय—“विधान परिषदेत केशव घोळवे गेले, तर आमचा आवाज थेट सत्तेच्या टेबलावर पोहोचेल.” आता भाजप नेतृत्व हा आवाज ऐकते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
