✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ एप्रिल २०२६ ।। जगाच्या नकाशावर फारसा गाजावाजा नसलेला Panama अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, आणि कारणही तितकेच थरारक. पश्चिम आशियात वाढलेल्या तणावामुळे Strait of Hormuz हा महत्त्वाचा समुद्री मार्ग असुरक्षित झाला, आणि त्याच क्षणी जागतिक व्यापाराने पर्यायी रस्ता शोधला. इथेच Panama Canalने आपली ताकद दाखवली. तेल वाहतुकीसाठी जग मोठ्या प्रमाणावर होर्मुझवर अवलंबून असताना, त्या मार्गातील अडथळ्यांनी शिपिंग कंपन्यांना पनामा कालव्याकडे वळायला भाग पाडले. आणि या वळणानेच पनामासाठी अक्षरशः ‘सोन्याची खाण’ उघडली.
पनामा कालव्यावर सध्या एवढी गर्दी आहे की, जहाजांना पुढे जाण्यासाठी स्पर्धा करावी लागतेय. नेहमी ठराविक शुल्क भरून पार होणाऱ्या जहाजांना आता ‘लिलाव’ पद्धतीने मार्ग मिळतो—जो जास्त पैसे मोजेल, त्याला आधी वाट! या शर्यतीत काही कंपन्यांनी तब्बल ४० लाख डॉलर, म्हणजेच सुमारे ३७ कोटी रुपये मोजून प्राधान्य मिळवले. एका टँकरसाठी इतकी रक्कम देण्याची वेळ येणे, हेच या संकटाची तीव्रता दाखवते. पूर्वी काही लाख डॉलरमध्ये भागणारा ‘जलद मार्ग’ आता कोट्यवधींच्या बोलीपर्यंत पोहोचला आहे. परिणामी, पनामाच्या तिजोरीत पैसा ओसंडून वाहतोय, तर दुसरीकडे जगातील व्यापार खर्चिक होत चाललाय.
या साऱ्या घडामोडींमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली—जागतिक व्यापार हा केवळ वस्तूंचा खेळ नाही, तर मार्गांचा देखील खेळ आहे. होर्मुझसारखा संवेदनशील मार्ग असुरक्षित झाला की, त्याचे पडसाद थेट इंधन दरांपासून रोजच्या वस्तूंपर्यंत उमटतात. पनामाला मिळालेली ही ‘लॉटरी’ इतर देशांसाठी मात्र इशारा आहे. कारण वाढलेल्या वाहतूक खर्चामुळे महागाईची तलवार आता सामान्यांच्या खिशावर येऊन ठेपण्याची शक्यता आहे. एका बाजूला छोटा देश कमाईच्या शिखरावर, तर दुसऱ्या बाजूला जगभरातील ग्राहक वाढत्या किंमतींच्या ओझ्याखाली—हीच या जागतिक समीकरणाची खरी कथा ठरते.
