महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०४ मे २०२६ ।। पश्चिम बंगालच्या विधानसभा निकालानंतर राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलल्याचं चित्र दिसत आहे. ममता बॅनर्जी यांच्या १५ वर्षांच्या सत्तेला धक्का देत भारतीय जनता पक्षने बहुमत मिळवल्याने आता नवीन मुख्यमंत्री कोण, हा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रिय अभिनेत्री आणि अनुभवी नेत्या रूपा गांगुली यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जोरदारपणे चर्चेत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या महिला नेतृत्वाची शक्यता अधिक बळकट होताना दिसते.
रूपा गांगुली या ‘महाभारत’ मालिकेतील द्रौपदी भूमिकेमुळे संपूर्ण देशात घराघरात पोहोचल्या. अभिनयातून लोकप्रियता मिळवल्यानंतर त्यांनी राजकारणातही आपली ठसठशीत ओळख निर्माण केली आहे. २०१५ मध्ये त्या भाजपमध्ये सामील झाल्या आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. राज्यसभेतील त्यांचा अनुभव आणि संघटनात्मक काम यामुळे त्या पक्षातील महत्त्वाच्या चेहऱ्यांपैकी एक मानल्या जातात.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षला असा महिला चेहरा हवा आहे, जो थेट ममता बॅनर्जी यांना राजकीय टक्कर देऊ शकेल. राजकीय विश्लेषकांच्या मते, लोकप्रियता, जनसंपर्क आणि राज्यात असलेली ओळख पाहता रूपा गांगुली या निकषात बसतात. त्यामुळे त्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. आता पक्ष अंतिम निर्णय काय घेतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
