महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०४ मे २०२६ ।। भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी या विधानसभा निवडणुकांचे निकाल मिश्र स्वरूपाचे ठरले आहेत. काही राज्यांत दिलासा मिळाला असला तरी मोठ्या लढतींमध्ये अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. केरळमध्ये मात्र काँग्रेसने सर्वात मोठं यश मिळवत सत्ता हस्तगत केली आहे. डावी आघाडीला पराभूत करत येथे काँग्रेसने ५५ जागा जिंकल्या असून आणखी ८ जागांवर आघाडी कायम आहे, त्यामुळे हा निकाल पक्षासाठी मोठा दिलासा मानला जातो.
आसाममध्ये मात्र काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही. भारतीय जनता पक्षने सत्ता राखत हॅट्ट्रिक साधली असून काँग्रेसच्या पदरात सुमारे २० जागांवरच आघाडी दिसत आहे. या राज्यात विरोधी पक्ष म्हणून मजबूत पुनरागमन होईल अशी अपेक्षा होती, पण निकालांनी काँग्रेसला मर्यादित यशच दिलं.
तामिळनाडूमध्ये काँग्रेसने तुलनेने सौम्य कामगिरी केली आहे. येथे एका जागेवर विजय मिळवत चार मतदारसंघांत आघाडी कायम आहे. तर पश्चिम बंगालमध्ये गेल्या वेळी शून्य असलेली कामगिरी सुधारत यंदा काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे. एकूणच, या निकालांमधून स्पष्ट होतं की काँग्रेसला केरळमध्ये मोठं यश मिळालं असलं तरी इतर राज्यांमध्ये त्यांची ताकद मर्यादितच राहिली आहे.
