Pimpri Chinchwad Construction Safety Issues: विकासाच्या वेगाला सुरक्षेचा ब्रेक नाही! पिंपरी-चिंचवडमध्ये बांधकामांच्या छायेत नागरिकांचा जीव धोक्यात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ मे २०२६ ।। पिंपरी-चिंचवड शहर सध्या विकासाच्या नव्या उंचीवर झेपावत असले तरी या झपाट्याने सुरू असलेल्या कामांमागे सुरक्षेची मोठी पोकळी उघड होत आहे. एका बाजूला मेट्रोचे खांब, रुंदावणारे महामार्ग, नव्याने उभे राहणारे पदपथ आणि खासगी बांधकामांचा धडाका सुरू आहे; मात्र दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील प्रमुख रस्ते, बीआरटी मार्ग आणि बांधकामस्थळांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी निष्काळजीपणा आणि धोकादायक परिस्थिती स्पष्टपणे दिसून आली. विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना आता उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे.

नाशिक फाटा ते निगडीदरम्यान मेट्रो कामासाठी उभारलेली पत्र्यांची सुरक्षा भिंत अनेक ठिकाणी वाकलेली, तुटलेली किंवा पूर्णपणे गायब दिसत आहे. काही ठिकाणी पत्रे चुकीच्या पद्धतीने बसविल्याने वाहनचालकांसमोर अचानक अडथळे उभे राहत आहेत. आधीच अरुंद झालेल्या रस्त्यांवरून वाहन चालवताना चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. दुसरीकडे, बांधकामस्थळी लावलेल्या सुरक्षा जाळ्यांचीही दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. फाटलेल्या किंवा अर्धवट लटकलेल्या जाळ्यांमधून उडणारी सिमेंटची धूळ थेट नागरिकांच्या अंगावर पडत असल्याने परिसरातील रहिवासी आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत.

चिंचवड स्टेशन परिसरात तर परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. मेट्रो पिलरवर लटकणाऱ्या लोखंडी सळ्यांच्या खालीच प्रवासी उभे राहत असल्याचे चित्र समोर आले आहे. एखादी सळई निखळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आकुर्डी ते निगडीदरम्यान सुरू असलेल्या पदपथ कामांमध्येही वाहतूक नियंत्रण, बॅरिकेड्स किंवा सूचना फलकांचा पूर्ण अभाव दिसून आला. उडणारी धूळ, खडी आणि बांधकाम साहित्य थेट वाहनचालक व पादचाऱ्यांच्या अंगावर पडत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहराच्या विकासाला विरोध नसला, तरी तो नागरिकांच्या जीवावर बेतणार नसेल याची जबाबदारी प्रशासन आणि कंत्राटदारांनी घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *