Pune Traffic: पुण्याच्या वाहतुकीला आता ‘पाताळ’ मार्ग; जमिनीखालून धावणार शहर, ३४ हजार कोटींचा महासंकल्प!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ मे २०२६ ।। पुणे : पुणेकरांच्या रोजच्या प्रवासाला कंटाळा, सिग्नलवरची धूळ आणि तासन्‌तास रेंगाळणारी वाहतूक आता थेट जमिनीखाली जाणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. शहरातील कोंडी फोडण्यासाठी तब्बल ५६ किलोमीटरचे पाच भुयारी मार्ग उभारण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा पुढे आला असून, या ‘पाताल लोक’ प्रकल्पामुळे पुण्याच्या रस्ते व्यवस्थेचे भवितव्यच बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून या योजनेला वेग मिळाला असून, त्यासाठी स्वतंत्र ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आठ दिवसांत प्राथमिक अहवाल राज्य सरकारकडे सादर होणार असल्याने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

निवडणूक प्रचारात दिलेले आश्वासन आता प्रत्यक्ष आराखड्यात उतरू लागल्याने या प्रकल्पाकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. येरवड्यातील शास्त्रीनगर ते कोंढवा खडीमशीन चौक, सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान ते औंधमार्गे जगताप डेअरी चौक, खडकी ते शास्त्रीनगर, तसेच सेव्हन लव्हज् चौक आणि बाणेर-पाषाण परिसर अशा महत्त्वाच्या भागांना हे भुयारी जाळे जोडले जाणार आहे. यापूर्वी पीएमआरडीएकडे या मार्गाचा प्राथमिक आराखडा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती; मात्र तो परिपूर्ण नसल्याचे निरीक्षण नोंदवत आता महापालिकेला थेट अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्याच्या वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर तयारी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल ३४ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, तो ‘पीपीपी’ तत्त्वावर राबविण्याचा विचार सुरू आहे. आंतरराष्ट्रीय सल्लागारांची नियुक्ती करून प्रकल्पाची तांत्रिक आखणी अधिक सक्षम करण्यात येणार आहे. प्रस्तावित ‘एसपीव्ही’मध्ये महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि वाहतूक तज्ज्ञांचा समावेश असेल. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसोबत रस्त्यांची मर्यादा संपत चालली असताना आता उपाय म्हणून शहर थेट जमिनीखाली उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे भविष्यात पुण्याच्या ट्रॅफिकची ओळख सिग्नलपेक्षा ‘सुरुंगां’मुळे होणार का, असा प्रश्नही आता चर्चेत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *