महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ मे २०२६ ।। वॉशिंग्टन : वॉशिंग्टनमध्ये शांततेच्या चर्चांचे पडदे हलकेच सरकत असतानाच जगाला पुन्हा युद्धाच्या सावटाची चाहूल लागली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात प्राथमिक कराराचा धागा जुळत असल्याच्या चर्चा रंगल्या; पण त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला उघड शब्दांत इशारा देत वातावरण तापवले. “होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले होतील,” असे त्यांनी जाहीर करत जगातील तेलवाहतुकीच्या सर्वांत महत्त्वाच्या मार्गाभोवती भीतीचे ढग दाटवले. ट्रम्प यांच्या ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टनंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.
अमेरिकन माध्यमांच्या वृत्तानुसार, युद्ध थांबवण्यासाठी आणि नव्या अणुचर्चेचा मार्ग मोकळा करण्यासाठी दोन्ही देश एकपानी सामंजस्य कराराच्या जवळ पोहोचले आहेत. पुढील ४८ तासांत इराणचा अंतिम प्रतिसाद अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या करारासाठी अमेरिकेने इराणपुढे कठोर अटी ठेवल्या आहेत. युरेनियम संवर्धन पूर्ण थांबवणे, हौती बंडखोर व हिजबुल्लाहसारख्या समर्थक गटांकडून होणारे ड्रोन-क्षेपणास्त्र हल्ले बंद करणे आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना कोणताही अडथळा न आणणे या अटींवर अमेरिका ठाम असल्याचे समजते. इराणने या अटी मान्य केल्या, तरच मध्यपूर्वेतील धग कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, इराणलाही काही मोठे दिलासे देण्याची तयारी अमेरिका दाखवत असल्याचे संकेत आहेत. परदेशात गोठवलेला अब्जावधी डॉलर्सचा निधी टप्प्याटप्प्याने मुक्त करणे, इराणच्या बंदरांभोवतीची नौदल नाकेबंदी हटवणे आणि ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’अंतर्गत सुरू असलेल्या हवाई कारवाया थांबवणे, या बाबींवर सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. मात्र, एका हातात कराराचा कागद आणि दुसऱ्या हातात बॉम्बची धमकी अशा अमेरिकन भूमिकेमुळे जगभरातील बाजारपेठा, तेल उद्योग आणि सामरिक तज्ज्ञांचे लक्ष आता इराणच्या पुढील निर्णयाकडे खिळले आहे.
