![]()
पूर्व किनारपट्टी सर्वाधिक संवेदनशील; ओडिशा, आंध्र प्रदेश आघाडीवर, तर गुजरात आणि उत्तर कोकणालाही धोका
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। Cyclone Risk in India : समुद्र शांत दिसतो म्हणून किनारपट्टी सुरक्षित आहे, असा समज करून घेणे म्हणजे संकटाला निमंत्रण देण्यासारखे आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होणारी चक्रीवादळे भारताच्या पूर्व किनारपट्टीला वारंवार धडक देतात. नुकतेच ‘मुरसू’ या तीव्र चक्रीवादळाने ३ नोव्हेंबरला पहाटे ३.३० ते ५.३० दरम्यान आंध्र प्रदेशातील ओंगोळेजवळ किनारा ओलांडला. त्यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर, तर झोत १२० किलोमीटरपर्यंत होता. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, किनारा ओलांडल्यानंतरही मुसळधार पाऊस आणि वाऱ्यांचा धोका कायम राहिला. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांपैकी ६० टक्क्यांहून अधिक वादळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडकतात. त्यामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू ही राज्ये विशेष संवेदनशील मानली जातात.
ओडिशातील बालासोर, केंद्रपाडा, जगतसिंहपूर आणि भद्रक; पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा आणि मेदिनीपूर; तसेच आंध्र प्रदेशातील नेल्लोर, कृष्णा आणि पूर्व गोदावरी हे जिल्हे अतिउच्च जोखमीच्या यादीत आहेत. आंध्र प्रदेशातील प्रकाशमसह अनेक किनारी जिल्हेही धोक्याच्या श्रेणीत येतात. तामिळनाडूच्या उत्तरेकडील किनारपट्टीला दक्षिणेकडील भागापेक्षा अधिक धोका आहे. सुंदरबन परिसरात समुद्राच्या पाण्याची घुसखोरी, वादळी लाटा आणि पूर यांचे संकट अधिक गंभीर ठरू शकते. मात्र, प्रत्येक चक्रीवादळाचा मार्ग आणि तीव्रता वेगळी असते. त्यामुळे एखाद्या राज्याला कायमच सर्वाधिक फटका बसेल, असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.
पश्चिम किनारपट्टीही निर्धास्त नाही. अरबी समुद्रातील चक्रीवादळांपैकी अनेक वादळे समुद्रातच क्षीण होतात; तरी गुजरातचा किनारा तुलनेने अधिक संवेदनशील आहे. कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील जिल्ह्यांना धोका असतो. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि रायगड हे जिल्हेही उच्च जोखमीच्या वर्गात आहेत. गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये थेट धडक तुलनेने कमी असली, तरी अतिवृष्टी आणि जोरदार वाऱ्यांचा फटका बसू शकतो. चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर कमकुवत झाले, तरी त्याचे अवशेष तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात पाऊस व पूरस्थिती निर्माण करू शकतात. म्हणूनच किनारपट्टीवरील नागरिकांनीच नव्हे, तर अंतर्भागातील प्रशासनानेही सतर्क राहणे आवश्यक आहे. इशारे दुर्लक्षित केले, तर निसर्ग नुकसानाची किंमत व्याजासह वसूल करतो.
