महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ मे २०२६ ।। मध्यपूर्वेच्या रणांगणात आता धुरापेक्षा जास्त चर्चा सॅटेलाईट फोटोंची होत आहे. कारण इराणने अमेरिकन तळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर समोर आलेल्या छायाचित्रांनी जगाला अक्षरशः हादरवून सोडलं आहे. ज्या नुकसानीला सुरुवातीला “मर्यादित” म्हटलं जात होतं, त्याचं चित्र आता इतकं भीषण दिसू लागलं आहे की, युद्धाच्या सावल्या थेट वॉशिंग्टनपर्यंत पोहोचल्याची चर्चा रंगू लागली आहे. रणांगणावर क्षेपणास्त्रांचा आवाज थांबला असेल; पण सॅटेलाईट फोटोंनी मात्र नवा स्फोट घडवला आहे.
इराणच्या सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील अनेक तळांवर मोठ्या प्रमाणात विध्वंस झाल्याचा दावा करण्यात आला होता. सुरुवातीला या छायाचित्रांकडे संशयाने पाहिलं गेलं; पण आंतरराष्ट्रीय पडताळणीनंतर परिस्थिती वेगळीच असल्याचं स्पष्ट होत आहे. हँगर्स, इंधन डेपो, कम्युनिकेशन सेंटर, रडार सिस्टम आणि एअर डिफेन्स यंत्रणा या हल्ल्यांत उद्ध्वस्त झाल्याचं सांगितलं जात आहे. काही तळ इतके असुरक्षित बनले की, अमेरिकेला स्वतःच्या कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षित भागात हलवावं लागल्याची माहिती समोर आली आहे.
युद्ध सुरू झाल्यापासून अनेक अमेरिकन जवानांचा मृत्यू झाला असून शेकडो सैनिक जखमी झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, मार्चनंतर या भागातील सॅटेलाईट फोटोंवर मर्यादा आणण्यात आल्याने प्रत्यक्ष नुकसानीची माहिती बाहेर येणं कठीण झालं होतं. पण इराणकडून सातत्याने प्रसिद्ध होणाऱ्या छायाचित्रांनी परिस्थितीचं वेगळंच चित्र उभं केलं. जगभरातील माध्यमांनी सुरुवातीला या फोटोंना फारसं गांभीर्याने घेतलं नव्हतं; मात्र नंतरच्या पडताळणीत अनेक दावे खरे ठरत असल्याचं समोर आल्यानं अमेरिकेची मोठी कोंडी झाली आहे.
या संघर्षाने आता केवळ दोन देशांमधील युद्धाचं रूप न राहता जागतिक शक्तिसंतुलनाचा प्रश्न निर्माण केला आहे. मध्यपूर्वेतील प्रत्येक स्फोटाचा आवाज आता तेलबाजारापासून जागतिक राजकारणापर्यंत पोहोचू लागला आहे. एकेकाळी अभेद्य मानले जाणारे तळ जर अशा प्रकारे हादरू शकत असतील, तर आधुनिक युद्धात ‘सुरक्षित’ हा शब्द किती कमकुवत झाला आहे, हेच या घटनांनी दाखवून दिलं आहे.
