बोगस FDR देणाऱ्या ठेकेदारांवर मनपाने कारवाई करावी – आमदार आण्णा बनसोडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – दि. २२ सप्टेंबर – पिंपरी चिंचवड महापालिकेने मागील ३ वर्षात राबविलेल्या निविदांवर ११ % पेक्षा कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांनी PSD म्हणून दिलेले FDR तपासण्याची मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्राद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे. ११ % पेक्षा कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांनी PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) म्हणून मनपास दिलेले अनेक FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट ) खोटे की खरे याबाबत खात्री मनपाकडे नाही.

खोटे व बोगस FDR बनवून देणारी टोळी शहरात कार्यरत असून असे अनेक बोगस FDR ठेकेदारांनी महापालिकेस दिलेले आहेत. या प्रकरणात मोठे रॅकेट असून ठेकेदार व अधिकारी यांचे संगनमत असल्याने या प्रकरणाची वाच्चता झाली नाही. महापालिका ठेकेदार काम मिळविण्यासाठी कमी दराने निविदा भरतात. हजारो कामासाठी मनपा टेंडर मागवीत असते या कामासाठी निविदांमध्ये स्पर्धा होऊन २०, २५, ३०, ३२ टक्के कमी दराने निविदा ठेकेदार भरतात व काम मिळवतात. काम मिळाल्यानंतर PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) म्हणून मनपास FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट ) देणे बंधनकारक असल्याने मोठया रक्कमा बँकेकडे ठेऊन ठेव पावती अथवा डीडी स्वरूपात FDR मनपाकडे जमा करावा लागतो. जमा केलेला FDR खोटा की खरा याची खात्री अथवा तपासणी मनपा करीत नाही.

नेमका याचाच फायदा घेऊन बनावट FDR तयार करून देणारी टोळी सक्रीय झाली व ठेकेदार असे बनावट FDR मनपाकडे जमा करीत असल्याने या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारांवर मनपाची फसवणूक केली म्हणून गुन्हे दाखल करून काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी बनसोडे यांनी मनपा आयुक्त यांचेकडे केली आहे. या प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा असल्याची बाब चौकशी नंतर उघडकी येईल अशी स्पष्टोक्ती आमदार बनसोडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *