भारताला हवे तितके इंधन देण्याची अमेरिकेची तयारी; क्वाड बैठकीपूर्वी मार्को रुबियो यांचे धडाकेबाज संकेत
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ मे २०२६ ।। Marco Rubio India Visit:राज्यात आणि देशात इंधनटंचाईच्या चर्चांनी धुरळा उडालेला असतानाच अमेरिकेकडून आलेल्या एका घोषणेने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी भारताला हवे तेवढे इंधन पुरवण्याची तयारी दर्शवत वॉशिंग्टनचा दरवाजा नवी दिल्लीसाठी पूर्णपणे खुला असल्याचे जाहीर केले. मियामी येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भारताला “महान मित्रराष्ट्र” आणि “विश्वासू भागीदार” म्हणत अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली.
“भारताला जितकी ऊर्जा खरेदी करायची असेल, तितकी ऊर्जा आम्ही देण्यास तयार आहोत,” असे ठणकावत रुबियो यांनी जगाच्या ऊर्जा राजकारणात नवा संदेश दिला. इंधनाच्या वाढत्या मागणीने देशात निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर आलेले हे विधान म्हणजे दिल्लीसाठी दिलास्याचा श्वास मानला जात आहे.
रुबियो यांच्या भारत दौऱ्याला केवळ राजनैतिक नव्हे तर सामरिक आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झाले आहे. 23 ते 26 मेदरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात ते नवी दिल्ली, कोलकाता, आग्रा आणि जयपूर येथे विविध बैठका घेणार आहेत. विशेष म्हणजे, तब्बल 14 वर्षांनंतर कोलकात्यात पाऊल ठेवणारे ते पहिले अमेरिकन परराष्ट्र सचिव ठरणार आहेत. यापूर्वी 2012 मध्ये तत्कालीन परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी कोलकात्याला भेट दिली होती.
क्वाड देशांच्या बैठकीविषयी बोलताना रुबियो यांनी स्पष्ट केले की, “परराष्ट्र मंत्री झाल्यानंतर माझी पहिली महत्त्वाची बैठक क्वाडसोबत झाली होती. आता ती भारतात होत असल्याचा मला विशेष आनंद आहे.” या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अध्यक्षस्थान भूषवणार असून ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री मोटेगी तोशिमित्सू हेही सहभागी होणार आहेत.
दरम्यान, या दौऱ्यात व्हेनेझुएलाच्या तेलाचा मुद्दाही गाजणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज पुढील आठवड्यात भारतात येणार असून तेलविक्रीसंदर्भात चर्चा होणार असल्याचे रुबियो यांनी सांगितले. त्यामुळे जागतिक तेलबाजारातील नवे समीकरण आकार घेत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी भारताने व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी केल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर भारत-अमेरिका व्यापार संबंधांतही मोठी हालचाल झाली. दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार भारतीय आयातीवरील परस्पर शुल्क 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आले.
एकीकडे जग इंधनसंकटाच्या धगीत होरपळत असताना दुसरीकडे अमेरिका भारताला ऊर्जा पुरवठ्याचा हात देत आहे. त्यामुळे दिल्लीतील सत्ताकेंद्रात समाधानाचे हास्य फुलले असले तरी या मैत्रीच्या बदल्यात भविष्यात कोणते नवे राजकीय समीकरण जन्माला येणार, याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.
