![]()
तेल कंपन्यांचा रोज ७५० कोटींचा तोटा; पेट्रोल-डिझेल १४ रुपयांनी महागण्याचे संकेत
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ मे २०२६ ।। नवी दिल्लीच्या सत्ताकेंद्रातून पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर कुर्हाड चालवणारी बातमी बाहेर पडली आहे. आधीच महागाईच्या धगीत भाजलेल्या जनतेला आता पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा नवा चटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विश्लेषकांच्या अंदाजानुसार आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर तब्बल ११ ते १४ रुपयांनी वाढू शकतात. गेल्या आठवड्यातच जवळपास ४ रुपयांची वाढ झाल्याने वाहनधारकांचा जीव मेटाकुटीला आला असतानाच ही नवी शक्यता समोर आली आहे. तेल कंपन्यांना सध्या दररोज तब्बल ७५० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याने इंधनदरवाढ अपरिहार्य बनल्याचे आर्थिक वर्तुळात बोलले जात आहे. “आधीच खिसा रिकामा, त्यात पेट्रोलचा फटका भारी,” अशी अवस्था आता नागरिकांची झाली आहे.
इंधनदरवाढीचा इतिहास पाहिला तर जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारे अनेक प्रसंग देशाने अनुभवले आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात २०२२ मध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात तब्बल ११ टक्क्यांची वाढ झाली होती. त्याआधी २०१३ मध्ये कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमुळे दरात जवळपास २० टक्के वाढ करण्यात आली होती. त्या तुलनेत अलीकडील ४ रुपयांची वाढ ही केवळ “ट्रेलर” असल्याची कुजबूज आता बाजारात सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या चढ्या किंमती, डॉलरसमोर घसरत चाललेला रुपया आणि तेल कंपन्यांचा वाढता आर्थिक बोजा यामुळे सरकारसमोरही मोठे आव्हान उभे ठाकले आहे. परिणामी, दरवाढीचा हा वणवा आता थांबण्याऐवजी आणखी भडकणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दरवाढीच्या या सावटाने वाहन उद्योगाचेही धाबे दणाणले आहेत. इंधनाचा खर्च सतत वाढत असल्याने ग्राहक नवीन वाहन खरेदी करण्याचे निर्णय पुढे ढकलतील, अशी भीती वाहन उत्पादक कंपन्यांनी व्यक्त केली आहे. विशेषतः व्यावसायिक वाहने आणि ट्रॅक्टर विक्रीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच मंदीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या बाजारपेठेला या वाढत्या इंधनदरांनी आणखी खिंडार पाडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. वाहन चालवणे म्हणजे आता चैन ठरणार का, असा प्रश्न मध्यमवर्गीय कुटुंबांत विचारला जाऊ लागला आहे.
तेलाच्या किंमती अशाच गगनाला भिडत राहिल्यास त्याचा थेट परिणाम देशातील महागाईवर होणार आहे. वाहतूक खर्च वाढल्याने अन्नधान्यापासून बांधकाम साहित्यापर्यंत सर्व वस्तूंचे दर वाढू शकतात. त्यामुळे ग्राहकांची बचत कमी होईल, खर्च करण्याची ताकद घटेल आणि बाजारातील मागणी मंदावेल. एका बाजूला पगार जागच्या जागी थांबलेले आणि दुसऱ्या बाजूला महागाईचे राक्षसी तोंड अधिकच मोठे होत चाललेले — अशा कात्रीत सामान्य माणूस सापडला आहे. पेट्रोलपंपावरील आकडे वाढत असताना जनतेच्या चेहऱ्यावरची चिंता मात्र दिवसेंदिवस गडद होत चालली आहे.
