Gold Silver Price Today: सोन्याची चमक फिकी; चांदीलाही उतरली झळाळी

Spread the love

Loading

सराफा बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर चिंता, ग्राहक मात्र आनंदात

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मे २०२६ ।। Gold Silver Rate Today: कालपर्यंत लग्नसराईच्या बाजारात “सोनं घ्या, उद्या महाग होईल!” असा दम देणारे सराफ आता स्वतःच कॅल्क्युलेटरवर बोटं फिरवत बसले आहेत. कारण, आज सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दराने असा पलटा मारला की, गुंतवणूकदारांचे चेहरे पडले आणि ग्राहकांच्या डोळ्यांत मात्र चमक परतली. २४ कॅरेट सोन्याचा भाव तब्बल ५७१ रुपयांनी खाली आला आणि १० ग्रॅमसाठी १ लाख ५७ हजार ४० रुपयांवर स्थिरावला. चांदीने तर थेट घसरणीचा ‘धडाका’च लावला. किलोमागे तब्बल ४ हजार ५०३ रुपयांनी स्वस्त होत ती २ लाख ६१ हजार ७१० रुपयांवर आली. बाजारात सोन्यापेक्षा जास्त चर्चा आता चांदीच्या घसरणीची सुरू आहे.

कालपर्यंत “सोनं म्हणजे सुरक्षित गुंतवणूक” अशी व्याख्यानं देणारे तज्ज्ञ आज मात्र डॉलर, युद्ध, व्याजदर आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा पाढा वाचताना दिसत आहेत. २३ कॅरेट सोनं ५६९ रुपयांनी घसरून १ लाख ५६ हजार ४११ रुपयांवर आलं, तर २२ कॅरेट सोन्यानेही ग्राहकांना थोडासा दिलासा दिला. १८ कॅरेट आणि १४ कॅरेट सोन्यातही मोठी घसरण झाली. पण गंमत अशी की, दर घसरले तरी ग्राहकांचा विश्वास अजूनही वाढलेलाच आहे. कारण भारतात सोनं हे फक्त धातू नाही, तर प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. घरात सोनं असलं की, कर्जदारही दोनदा विचार करतो आणि नातेवाईकही आदराने बोलतात, अशी मानसिकता अजून बदललेली नाही.

याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केलेलं “एक वर्ष सोनं खरेदी करू नका” हे आवाहन पुन्हा चर्चेत आलं आहे. पण भारतीय ग्राहक म्हणजे हट्टी राजा! आवाहनानंतर सोनं कमी होण्याऐवजी तब्बल जवळपास ६ हजार रुपयांनी महाग झालं. आता किंमती उतरल्या तरी बाजारात संभ्रमाचं वातावरण आहे. काही जण ही घसरण तात्पुरती असल्याचं सांगत आहेत, तर काहींच्या मते अजून मोठा उतार बाकी आहे. दरम्यान, सोन्याचा भाव त्याच्या ऑल टाईम हाय पातळीवरून जवळपास १९ हजार रुपयांनी खाली आला असला, तरी सामान्य माणसासाठी तो अजूनही ‘स्वप्नातील दागिना’च ठरत आहे.

चांदीची स्थिती तर अधिक नाट्यमय झाली आहे. काही दिवसांपूर्वी किलोमागे जवळपास चार लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचलेली चांदी आता थेट एक लाखाहून अधिक रुपयांनी खाली आली आहे. सराफा बाजारातील व्यापाऱ्यांच्या भाषेत सांगायचं तर, “बाजारात आता तेजीपेक्षा भीती जास्त विकली जातेय!” आंतरराष्ट्रीय राजकारण, इराण-अमेरिका तणाव, डॉलरमधील चढउतार आणि व्याजदरांच्या चर्चांनी बाजाराला अक्षरशः ताप दिला आहे. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे—सोनं-चांदीचा बाजार हा आता फक्त दागिन्यांचा राहिलेला नाही; तो थेट जगाच्या राजकारणाशी जोडला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *