![]()
रोख काढण्यापूर्वी खिशाचा हिशेब करा; बँकिंग सेवांवर महागाईची नवी सावली
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मे २०२६ ।। देशात आता अशी वेळ आली आहे की, स्वतःचे पैसे काढायलाही माणसाला जादा पैसे मोजावे लागणार आहेत! एटीएमसमोर उभा राहणारा ग्राहक आतापर्यंत फक्त “बॅलन्स किती उरलाय?” याची चिंता करत होता; पण आता “पैसे काढायला किती कापतील?” हा नवा प्रश्न त्याच्या डोक्यावर येऊन बसला आहे. कारण कॅश लॉजिस्टिक्स कंपन्यांनी बँकांकडे एटीएम व्यवस्थापन शुल्क वाढवण्याची मागणी केली आहे. आणि भारतात एखाद्या उद्योगाने “खर्च वाढला” असं म्हटलं की शेवटी फटका सामान्य माणसालाच बसतो, हा अनुभव जुना आहे. त्यामुळे कोट्यवधी खातेधारकांच्या खिशावर आता एटीएमचा नवा हात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कॅश लॉजिस्टिक्स कंपन्यांचं म्हणणंही काही उगाच नाही. डिझेल-पेट्रोलचे दर रोज नवा विक्रम करत आहेत. एटीएममध्ये पैसा भरायला जाणाऱ्या व्हॅन आता जणू सोनं वाहतूक करत असल्यासारख्या खर्चिक बनल्या आहेत. सुरक्षा रक्षकांचे पगार वाढले, विम्याचा खर्च वाढला, तंत्रज्ञानासाठी वेगळी गुंतवणूक वाढली आणि सरकारी नियमांचे पालन करताना कंपन्यांचा घाम निघू लागला. पण गंमत अशी की, या कंपन्यांना अजूनही जुन्याच दरात काम करायला सांगितलं जातंय. म्हणजे महागाईने सर्वांच्या खिशात हात घातला, पण शुल्क मात्र जुन्याच काळात गोठलेलं! त्यामुळे करन्सी सायकल असोसिएशनने थेट इंडियन बँक्स असोसिएशनला पत्र लिहून “आता आम्हालाही श्वास घ्यायला द्या,” अशी आर्त हाक दिली आहे.
या सगळ्या गोंधळात सर्वात मोठा बळी कोण ठरणार? अर्थातच सामान्य ग्राहक! कारण बँका कधी स्वतःचा भार स्वतः उचलतात का? कंपन्यांचे शुल्क वाढले की सेवा शुल्क वाढतं, व्यवहार शुल्क वाढतं आणि शेवटी ग्राहकाच्या खात्यातून पैशांची छोटी-छोटी कात्री सुरू होते. एटीएममधून ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढले की आधीच शुल्क आकारलं जातं. आता त्यात आणखी वाढ झाली, तर “स्वतःचे पैसे काढण्यासाठीही कर” अशी परिस्थिती निर्माण होईल. डिजिटल व्यवहारांचा गजर एकीकडे सुरू असला, तरी देशातील कोट्यवधी लोक अजूनही रोख पैशावर अवलंबून आहेत. गावागावात एटीएम म्हणजे अजूनही बँकेपेक्षा मोठा आधार आहे.
सर्वात धोक्याची बाब म्हणजे या कंपन्यांनी इशारा दिला आहे — जर शुल्कवाढ झाली नाही, तर रोख पुरवठा व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. म्हणजे एटीएमसमोर रांग आणि मशीनमध्ये “नो कॅश”चा बोर्ड हे दृश्य पुन्हा दिसू शकतं. महागाई आता फक्त भाजीपाला, पेट्रोल किंवा घरभाड्यापुरती राहिलेली नाही; ती थेट तुमच्या खिशातून पैसे काढण्याच्या प्रक्रियेतही शिरली आहे. आणि त्यामुळेच एटीएम मशीन आता फक्त नोटा देणार नाहीत, तर महागाईचा नवा धक्का देखील देणार आहेत!
