![]()
ओल्या कचऱ्याचे ६०० प्रकल्प बंद; नियम फलकावरच, दुर्गंधी मात्र रस्त्यावर
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मे २०२६ ।। पुणे शहराला “विद्येचं माहेरघर” म्हणतात, पण सध्या या माहेरघरातून ज्ञानापेक्षा जास्त दुर्गंधी बाहेर पडताना दिसतेय! स्मार्ट सिटीचे फलक झळकत आहेत, मोठमोठ्या सोसायट्यांच्या गेटवर इंग्रजीत “ग्रीन लिव्हिंग”चे बोर्ड चमकत आहेत; पण आतमध्ये ओल्या कचऱ्याचे डोंगर कुजत पडलेले आहेत. नियम सांगतो — रोज १०० किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या, हॉटेल्स आणि मंगल कार्यालयांनी स्वतःच्या परिसरात त्यावर प्रक्रिया करायची. पण पुण्यात नियम हा पाळण्यासाठी नसतो, तर धाब्यावर बसवण्यासाठी असतो, हे पुन्हा सिद्ध झालं आहे. तब्बल ६०० कचरा प्रकल्प बंद असल्याचं समोर आल्यानंतर महापालिकेची झोप उडाली आहे. मात्र नागरिक विचारताहेत — “ही झोप आताच का उडाली?”
पुण्यात तब्बल १ हजार ९४२ बल्क वेस्ट जनरेटर आहेत. म्हणजे रोज प्रचंड प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था. नियमांनुसार त्यांनी स्वतःच कचऱ्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. पण प्रत्यक्षात काय? अनेक सोसायट्यांमध्ये प्रकल्प बंद, मशीन गंजलेली आणि कचरा सरळ महापालिकेच्या गाड्यांवर ढकलला जातोय. काही ठिकाणी तर “कंपोस्ट प्रकल्प” हा फक्त उद्घाटनाच्या फितीपुरता उरला आहे. उद्घाटनावेळी फोटो, भाषणं आणि पर्यावरणप्रेमाचे डायलॉग झाले; पण नंतर मशीनवर कुलूप आणि कचरा पुन्हा रस्त्यावर! पुण्याच्या पर्यावरणप्रेमाचा हा देखावा आता उघडपणे कुजायला लागला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी केली तेव्हा खरी पोलखोल झाली. ६०० पेक्षा जास्त प्रकल्प बंद असल्याचं स्पष्ट झालं. म्हणजे नियम फक्त कागदावर आणि कचरा प्रत्यक्षात जनतेच्या नाकावर! अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी आता कारवाईचे आदेश दिले आहेत. पण पुणेकरांना अशा कारवायांचीही चांगली सवय आहे. दोन दिवस धाड, तीन दिवस नोटिसा आणि चौथ्या दिवशी पुन्हा “जैसे थे!” कारण शहरात नियमांपेक्षा सोसायटींच्या “कमिटी” अधिक ताकदवान झाल्या आहेत. पर्यावरण वाचवण्याच्या बैठकीत चहा-बिस्किटांचा खर्च होतो; पण कचरा प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी लागणारा खर्च मात्र अनेकांना जड जातो.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुण्यात उंच टॉवर उभे राहिले, पण त्या टॉवरखाली कचऱ्याचं राजकारणही तितकंच उंचावलं. एकीकडे “स्वच्छ भारत”चे फलक आणि दुसरीकडे कुजणाऱ्या कचऱ्याचा वास — हेच पुण्याचं नवीन वास्तव बनत चाललं आहे. पर्यावरण, पुनर्वापर, हरित शहर या शब्दांचा मोठा गजर होतो; पण प्रत्यक्षात प्रत्येकजण आपला कचरा दुसऱ्याच्या अंगणात ढकलण्याच्या प्रयत्नात आहे. आणि त्यामुळे पुण्याचा ओला कचरा आता फक्त दुर्गंधी देत नाही, तर शहराच्या बेजबाबदारपणाचं उघड प्रदर्शन करत आहे!
