![]()
४७.६ अंशांनी ब्रह्मपुरी भाजलं; सरकारचे अलर्ट, पण नागरिकांचा जीव अक्षरशः टांगणीला
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मे २०२६ ।। विदर्भात सध्या उन्हाळा नाही, तर जणू अग्निपरीक्षाच सुरू आहे! आकाशातून सूर्य आग ओकत आहे आणि जमिनीवर माणूस, जनावरं, झाडं सगळंच होरपळून निघत आहे. ब्रह्मपुरी येथे तब्बल ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानंतर संपूर्ण राज्य हादरलं आहे. तापमानाचा पारा आता ५० अंशांच्या दिशेने वेगाने धावताना दिसतोय. “रस्त्यावर पाय ठेवावा की तव्यावर?” असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. घरात पंखे तापलेत, कूलरने शरणागती पत्करली आहे आणि एसीसमोर बसलेल्यांनाही घामाच्या धारा सुटत आहेत. विदर्भातला उन्हाळा आता ऋतू राहिलेला नाही; तो थेट संकट बनला आहे.
हवामान विभागाने अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. म्हणजे परिस्थिती धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे, हेच स्पष्ट! अकोला, नागपूर आणि गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. पण विदर्भातील जनतेला या अलर्टची नवलाई राहिलेली नाही. कारण दरवर्षी उन्हाळा आला की “काळजी घ्या” हे सरकारी वाक्य कानावर पडतं; मात्र गावोगावी पाण्याची टंचाई, विजेची लपंडाव आणि भाजून निघणारे रस्ते यावर ठोस उपाय मात्र अजूनही दिसत नाहीत. निसर्गाचा कोप वाढतोय आणि प्रशासनाचा गोंधळही त्याच वेगाने वाढताना दिसतोय.
नागपुरात तर परिस्थिती इतकी गंभीर झाली की मंत्रालयातून नागरिकांच्या मोबाईलवर थेट हाय-अलर्ट संदेश पाठवण्यात आले. अचानक फोनचा मोठा आवाज वाजला आणि लोक दचकले! काहींना वाटलं युद्धाचा इशारा आलाय की काय! पण तो संदेश होता — “पुढील २४ तास उष्णतेची तीव्र लाट.” आता उन्हाळ्याचे इशारेही मोबाईलवर सायरन वाजवत येऊ लागलेत, हीच खरी परिस्थितीची भीषणता आहे. ज्या उष्णतेकडे पूर्वी “मे महिन्याचं नेहमीचं ऊन” म्हणून पाहिलं जायचं, तीच उष्णता आता जीवघेणी बनू लागली आहे. रस्त्यावर काम करणारे मजूर, ट्रॅफिक पोलिस, शेतकरी आणि डिलिव्हरी बॉय यांची अवस्था तर अक्षरशः दयनीय झाली आहे.
प्रशासनाने दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचा, भरपूर पाणी पिण्याचा आणि हलक्या रंगाचे कपडे वापरण्याचा सल्ला दिला आहे. पण ज्यांच्या पोटाची भूक उन्हापेक्षा मोठी आहे, ते घरात बसणार तरी कसे? विदर्भात सध्या सूर्य फक्त तापत नाही, तर माणसाच्या सहनशक्तीची परीक्षा घेतोय. हवामान बदलाच्या चर्चांवर मोठमोठी भाषणं होतात; पण झाडं तोडणारे आणि काँक्रीटचं जंगल वाढवणारे हात मात्र थांबत नाहीत. परिणामी, आता निसर्गही जणू सूड उगवत आहे — आणि विदर्भ त्याच्या ज्वाळांत होरपळत आहे!
