![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जून २०२६ ।। देशाची इंधन आयात कमी करण्याच्या उद्देशाने पेट्रोलमध्ये अधिक प्रमाणात इथेनॉल मिश्रण करण्याबाबत केंद्र सरकार गंभीरपणे विचार करत असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यासंदर्भात विविध स्तरांवर चर्चा सुरू असून वाहन उत्पादक कंपन्यांनाही इथेनॉल मिश्रित इंधनावर कार्यक्षमतेने चालणारी इंजिने विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुण्यात वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) आयोजित ‘साखर आणि जैवऊर्जा परिषदेत’ ते बोलत होते. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार बजरंग सोनवणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भाग आणि कृषी क्षेत्रावर आधारित आहे. मात्र, अपेक्षित वेगाने विकास न झाल्याने ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आवश्यक आहे.
इथेनॉल उत्पादनाला चालना
साखर कारखान्यांनी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता इथेनॉल निर्मिती वाढवावी, असे आवाहन गडकरी यांनी केले. तांदूळ, मका, बांबू तसेच जैविक कचऱ्यापासूनही इथेनॉल उत्पादन शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांनी सांगितले की, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) येथे इथेनॉल मिश्रित इंधनासाठी आवश्यक तांत्रिक संशोधन सुरू आहे. भविष्यात पर्यायी इंधनांचा वापर वाढवून आयातीत इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
स्मार्ट व्हिलेजची गरज
“देशाला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवायचे असेल तर ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी क्षेत्राचा विकास वेगाने करावा लागेल. स्मार्ट शहरांसोबतच स्मार्ट गावांची उभारणी आणि सिंचन सुविधांचा विस्तार आवश्यक आहे,” असे गडकरी म्हणाले.
साखर उद्योगासमोरील आव्हाने
यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी साखर उद्योगात काही सुधारणा आवश्यक असल्याचे सांगितले. अनेक कारखान्यांनी गरज नसताना क्षमता वाढविल्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी उसाचे क्षेत्र वाढविण्याऐवजी प्रतिएकर उत्पादन वाढविण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. तसेच साखर कारखाने वेळेत सुरू झाल्यास उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
