महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. २४ सप्टेंबर -वाढत्या कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनीदेखील ‘महाराष्ट्र के लोग बहादुरीसे सामना करते है’ असे सांगून कोविडचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातल्या २० जिल्ह्यात विशेष समर्पित पथके नियुक्त करून संसर्ग कमी केल्यास देशाच्या कोरोना आकडेवारीवर परिणाम होईल अशी सूचना केली.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’सारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात मृत्यू दर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर कमी झालेला आपल्याला दिसेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यात सर्वत्र टेलिआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत असेही ते म्हणाले. कोविडनंतरदेखील रुग्णांमध्ये वैद्यकीय उपचारांची गरज असून उपचार केंद्रे सुरु करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.