अखंड श्रद्धेचा अकरावा दीप : अहिल्यादेवींच्या साप्ताहिक पुजेचा वर्धापनदिन उत्साहात

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24- ऑनलाईन- दिनांक 10 जून- पिंपरीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, मोरवाडी येथे गेल्या अकरा वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या रविवारच्या साप्ताहिक पुजेचा वर्धापनदिन यंदा भक्तिभाव, सामाजिक एकजूट आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मारुती शिकारे यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाच्या सातत्यपूर्ण वाटचालीचे कौतुक करत समाजजागृतीतील त्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.

‘पूजा म्हणजे केवळ विधी नव्हे, समाजसंवादाचे व्यासपीठ’

प्रा. मारुती शिकारे म्हणाले, “दर रविवारी होणारी ही पूजा केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर समाजाला जोडणारे व्यासपीठ आहे. पूजा झाल्यानंतरचे फोटो समाजगटांवर शेअर होतात, त्यातून चांगला संदेश जातो आणि लोकांमध्ये संवाद वाढतो.” प्रा. नामदेव तळपे यांनी युवकांनी सुरू केलेला हा उपक्रम पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. ज्येष्ठ समाजसेवक माणिक बारगळ यांनी जुन्या काळातील संघर्षांची आठवण करून देत, “आठाणे-एक रुपया वर्गणी गोळा करून उभारलेला हा पुतळा आज अशा उपक्रमांमुळे खऱ्या अर्थाने जिवंत झाला आहे,” असे भावनिक उद्गार काढले.

माजी नगरसेविका आशाताई शेंडगे यांनी या कार्यकर्त्यांच्या सातत्याचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या, “जयंतीच्या दिवशीच नव्हे, तर दर रविवारी पुतळ्याची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करणे ही खऱ्या अर्थाने स्मृती जपण्याची संस्कृती आहे. सलग ११ वर्षे एकही रविवार न चुकता हे कार्य करणे सोपी गोष्ट नाही; कोरोनाच्या काळातही ही परंपरा थांबली नाही.” अनिल राऊत यांनी “अहिल्याबाई नव्हे, अहिल्यादेवी होळकर” असा योग्य उल्लेख करण्याचे आवाहन केले.

तीन जणांपासून शेकडो समाजबांधवांपर्यंतचा प्रवास

कार्यक्रमाच्या शेवटी दिपक भोजने यांनी या उपक्रमाचा प्रवास सांगताना अनेक आठवणी उजाळल्या. त्यांनी सांगितले की, ७ जून २०१५ रोजी मेघडंबरी उभारल्यानंतर साप्ताहिक पुजेची सुरुवात झाली. सुरुवातीला फक्त तीन जण उपस्थित असत; पहिल्या पुजेला पाच-सात तर दुसऱ्या रविवारी दहा-पंधरा समाजबांधव जमले. “हळूहळू संख्या वाढली, नव्या ओळखी निर्माण झाल्या, व्हॉट्सॲप गट तयार झाले आणि समाज एकत्र येऊ लागला,” असे त्यांनी नमूद केले. महिला दिनाच्या कार्यक्रमात २०० ते २५० महिला सहभागी झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

भोजने पुढे म्हणाले, “अडचणी अनेक आल्या, पण पूजा कधी थांबवली नाही. मी आणि माझे सहकारी जोपर्यंत आहोत, तोपर्यंत दर रविवारी ही अखंड पूजा सुरू राहील.” वर्धापनदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर आणि रक्तदात्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. सूत्रसंचालन गोरोबा उर्फ काका शेळके यांनी केले, तर आभारप्रदर्शन दिपक भोजने यांनी केले.

उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते

कार्यक्रमास विजय भोजने, अजय दुधभाते, भरत महानवर, नामदेव मासाळ, सुनील माने, श्रीकांत धनगर, महावीर काळे, संभाजी लासके, सुमेध कावळे, परमेश्वर बुरले, सुरेखा महानवर, रेणुका भोजने, कौशल्या सोनवलकर, सोनाली कावळे, अश्विनी लोखंडे, कल्पना दरकसे, राहुल मदने, प्रदीप वाघमोडे, हिराकांत गाडेकर, शहाजी दन्ने, बीरू व्होनमाने, संजय कवितके, नितीन वाघमोडे, दिपक काळे, अमोल महानवर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदान शिबिरात धनंजय गाडे, सुनील माने, विनोद बरकडे, बंडू लोखंडे, सुभाष हाके, अदिनाथ यमगर, सुमित पांढरे, राजेश तोडकर आदींनी रक्तदान केले.

एक पूजा, अनेक अर्थ

या उपक्रमाने मोरवाडीतील अहिल्यादेवींचा पुतळा केवळ स्मारक न राहता समाजसंवाद, स्वच्छता, एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचे केंद्र बनला आहे. अकरा वर्षांची ही अखंड परंपरा आता पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक चळवळीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *