Pune Metro: मेट्रोचा प्रवास संथ; पुणेकरांची परीक्षा कायम

Spread the love

Loading

मुहूर्तावर मुहूर्त हुकले, आश्वासनांची रेलचेल सुरू; १२ स्थानके जुलैत खुली होणार, पण संपूर्ण मार्गासाठी अजून वर्षभर प्रतीक्षा

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जून २०२६ ।। पुणेकरांच्या संयमाची परीक्षा घ्यायची असेल, तर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पापेक्षा उत्तम उदाहरण दुसरे सापडणार नाही. गेली अनेक वर्षे या मार्गाचे उद्घाटन जणू कॅलेंडरवरील तारखांसोबत लपंडाव खेळत आहे. प्रत्येक काही महिन्यांनी नवा मुहूर्त जाहीर होतो, नवे आश्वासन दिले जाते आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुदतवाढीची घोषणा केली जाते. आता पुन्हा एकदा मेट्रोच्या पूर्ण मार्गासाठी जुलै २०२७ पर्यंत मुदतवाढ मागण्यात आली आहे. म्हणजे पुणेकरांनी स्वप्नात पाहिलेली संपूर्ण मेट्रो अजूनही कागदावरच धावत आहे. मात्र या प्रतीक्षेच्या अंधारात प्रशासनाने एक छोटासा दिवा दाखवला आहे. पहिल्या टप्प्यातील १२ स्थानके १५ जुलैपर्यंत सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले आहे.

खरे तर हा प्रकल्प केवळ वाहतुकीचा विषय राहिलेला नाही; तो पुणेकरांच्या आशा, अपेक्षा आणि नाराजीचे प्रतीक बनला आहे. आयटी हब असलेल्या हिंजवडीपासून शिवाजीनगरपर्यंतचा प्रवास रोज लाखो नागरिकांना वाहतूक कोंडी, धूर आणि वेळेच्या अपव्ययातून करावा लागतो. मेट्रो सुरू झाल्यावर या त्रासातून मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. पण प्रत्येक वेळी कामाचा वेग पाहून नागरिकांच्या आशांवर विरजण पडले. आता जूनचा शेवट, मग पावसाळा, मग काही तांत्रिक कामे अशा कारणांची यादी पुन्हा पुढे आली आहे. परिणामी ‘मेट्रो कधी सुरू होणार?’ हा प्रश्न पुणेकरांच्या चर्चेचा कायम विषय बनला आहे.

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे एवढा विलंब होऊनही ठेकेदारावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. प्रकल्प ‘पीपीपी’ तत्त्वावर असल्याने दंडात्मक कारवाईची मर्यादा असल्याचे प्रशासन सांगते. विलंबाची कारणे ठेकेदार मांडतो, प्रशासन ती मान्य करत नाही; पण त्याच वेळी कारवाईही होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात स्वाभाविकच प्रश्न निर्माण होत आहेत. जर एखाद्या नागरिकाने कर, वीजबिल किंवा इतर शासकीय देयके वेळेत भरली नाहीत तर त्याच्यावर दंड आकारला जातो. मग हजारो कोटींच्या प्रकल्पात वारंवार मुदत चुकवणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित का होत नाही, असा सवाल आता अधिक तीव्र होत आहे.

तरीही या प्रकल्पाकडून पुणेकरांच्या अपेक्षा संपलेल्या नाहीत. १५ जुलैपर्यंत १२ स्थानके सुरू होणार, ऑगस्टपर्यंत आणखी पाच स्थानके पूर्ण होतील आणि उर्वरित सहा स्थानके डिसेंबरपर्यंत तयार करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र त्याचवेळी जुलै २०२७ पर्यंत मुदतवाढ मागितली जात असल्याने नागरिक संभ्रमात आहेत. पुणेकरांना आता नव्या तारखा नकोत, तर प्रत्यक्ष धावणारी मेट्रो हवी आहे. कारण शहराची वाढती वाहतूक, वाढणारा वेळेचा अपव्यय आणि नागरिकांची सहनशीलता या तिन्ही गोष्टी आता अंतिम टप्प्यावर पोहोचल्या आहेत. मेट्रोचे डबे रुळावर धावतील तेव्हा आनंद होईलच; पण त्याहून मोठा दिलासा म्हणजे अखेर प्रतीक्षेचा प्रवास संपल्याची भावना असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *