महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नाशिक – २४ सप्टेंबर – नाशिक शहरासह देवळा, चांदवड, येवला, कळवण, मालेगाव आणि िंदडोरी या तालुक्यांना बुधवारी मध्यरात्री मुसळधार पावसाचा फटका बसला. खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकटया नाशिक शहरात रात्री अडीच-तीन तासात 51 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 14 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदी-नाल्यांना पूर आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर व परिसरात दररोज मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे. मंगळवारी रात्री शहरात वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतर दोन वाजेपर्यंत पावसाचा जोर वाढत गेला. त्यामुळे शहर परिसरातील रस्ते जलमय झाले होते. रात्री अवघ्या अडीच-तीन तासात शहरात 51 मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. आदिवासीबहुल तालुके वगळता इतरत्र जोरदार पाऊस झाला. देवळा- 83, चांदवड- 45, येवला- 33, मालेगाव, कळवण- प्रत्येकी 22, िंदडोरी- 20, सिन्नर- 10 मिलिमीटर अशी पावसाची आकडेवारी होती.
